सभा गुंडाळल्याचा विरोधकांचा आरोप

By Admin | Updated: August 31, 2014 23:37 IST2014-08-31T23:18:07+5:302014-08-31T23:37:46+5:30

शिक्षक बँक सभा : संघानेच गोंधळ घातल्याची सत्ताधाऱ्यांची टीका

The allegations of opponents of the gathering | सभा गुंडाळल्याचा विरोधकांचा आरोप

सभा गुंडाळल्याचा विरोधकांचा आरोप

सांगली : शिक्षक बँकेची सभा सत्ताधारी समितीनेच गुंडाळून पळ काढल्याचा आरोप शि. द. पाटील व संभाजी थोरात गटाने केला आहे, तर सभेचे कामकाज शांततेने करण्याचे आवाहन करूनही विरोधकांनी गोंधळ घालून गालबोट लावल्याची टीका समितीचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केली आहे.
शिक्षक बँकेची सभा प्रचंड गोंधळात अवघ्या दहा मिनिटातच संपली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तीनही संघटनांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. सत्ताधारी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड म्हणाले की, बँकेचे अध्यक्ष धानाप्पा माळी यांनी सुरुवातीलाच सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते. तसेच सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची तयारीही दर्शविली होती. तरीही विरोधकांनी गोंधळ घातला. शि. द. पाटील व संभाजी थोरात या दोन्ही गटाचे जिल्ह्यातील अस्तित्व संपुष्टात आले आहे. हे अस्तित्व दाखविण्यासाठी गोंधळ माजविला गेला. पण त्यांना सभासद जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.
थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष व संचालक विनायक शिंदे म्हणाले की, गेल्या सभेच्या इतिवृत्तात बेकायदेशीररित्या नोकरभरतीचा आकृतीबंध वाढविण्यात आला होता. त्याचा जाब विचारण्याचा निर्धार संघाने केला होता. सत्ताधारी व त्यांच्या नेत्यांची घरे भरण्यासाठी हा उपद्व्याप केला गेला आहे. तसेच लाभांश वाटपातही विश्वासघात केला आहे. या साऱ्यावर समितीकडे कोणतेच उत्तर नव्हते. सभासदांनी आकृतीबंध नामंजूर केला, तेव्हा त्यांनी सभेतून पळ काढला. सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घालून गालबोट लावले आहे. त्यामुळे ही सभा झालेली नाही, असा दावा केला.
संघप्रणित तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास शिंदे म्हणाले की, बँकेत भ्रष्टाचार व बेकायदेशीर कामे सुरू आहेत. संचालकांना अपात्र ठरविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. ते व्याजदर कमी करू शकलेले नाहीत. लाभांशही कमी दिला आहे. या अन्यायाविरोधात पाटील गटाने जोरदार आक्षेप घेतला. संचालकांना दहा प्रश्नही विचारले होते. पण त्यांचे साधे उत्तरही त्यांनी दिलेले नाही. त्यामुळेच आम्ही समांतर सभा घेऊन निषेध केला आहे. (प्रतिनिधी)

पदवीधर प्राथमिक शिक्षक सभेचा बहिष्कार
अनावश्यक नोकरभरती, संचालकांची उधळपट्टी याच्या निषेधार्थ पदवीधर प्राथमिक शिक्षक सभेने आजच्या वार्षिक सभेवर बहिष्कार टाकला होता. सभेत विद्यमान संचालकांनीच गोंधळ घालणे अशोभनीय आहे. या प्रकारामुळे शिक्षकांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. समितीने व्याजदर कमी करण्याचे आश्वासनही पाळलेले नाही. या साऱ्या गोष्टींचा पदवीधर संघटना निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भोसले यांनी सांगितले.

Web Title: The allegations of opponents of the gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.