कोरोनाची लस टोचून घेण्यात ज्येष्ठांची सव्वालाखी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:55+5:302021-04-11T04:25:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सुरुवातीच्या टप्प्यात मंद गतीने सुुरू असणारे लसीकरण आता वेग घेत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ...

All-round performance of seniors in injecting corona vaccine | कोरोनाची लस टोचून घेण्यात ज्येष्ठांची सव्वालाखी कामगिरी

कोरोनाची लस टोचून घेण्यात ज्येष्ठांची सव्वालाखी कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सुरुवातीच्या टप्प्यात मंद गतीने सुुरू असणारे लसीकरण आता वेग घेत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल त्यानुसार लसीकरणासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठांचाच उत्साह जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जिल्ह्यात आजवर दोन लाख ६८ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यामध्ये सव्वा लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. लसीचा दुसरा डोस घेण्यातही तेच आघाडीवर आहेत. महापालिका क्षेत्रात त्याचे प्रमाण जास्त आहे. महापालिकेच्या १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांत मोफत लस दिली जात आहे. लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येते; पण या तांत्रिक फंदात न अडकता ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड घेऊन थेट केंद्रात येत आहेत. ज्येष्ठांचा हा उत्साह आरोग्य यंत्रणेचाही उत्साह वाढविणारा ठरला आहे. लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी, होणारा त्रास, घ्यायची अैाषधे, पाळायची पथ्ये याचे सल्ले बारकाईने ऐकणारे ज्येष्ठ नागरिक लसीकरणात तरुणांनाही मागे टाकत आहेत.

जिल्ह्यात लस आली तेव्हा आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्याने देण्यात आली; पण अपेक्षेप्रमाणे हे लाभार्थी पुढे आले नाहीत. ज्येष्ठांसाठी लस खुली झाल्यानंतर मात्र तेदेखील गर्दी करू लागले. लसीमुळे कोणताही त्रास किंवा विपरीत परिणाम होत नाही हे ज्येष्ठांनी दाखवून दिले असेच म्हणावे लागेल. अगदी ९५ ते १०२ वर्षे वयाच्या वृद्धांनीही लस घेतली. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघांनीही मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली.

चौकट

ग्रामीण भागात उत्साह मोठा

- महापालिकेच्या १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांत मोफत लस दिली जात आहे. सांगली-मिरजेतील खासगी रुग्णालयांतही लसीकरणासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

- बुधवारपर्यंतच्या (दि. ७) अहवालानुसार जिल्हाभरातील उपकेंद्रांत ५० हजार ६७६ जणांचे लसीकरण झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत एक लाख पाच हजार ४६१, तर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत ४० हजार ८१५ जणांनी लस घेतली.

- खासगी रुग्णालयात २५० रुपये द्यावे लागत असल्याने आजवर फक्त ११ हजार २ जणांनी तेथे लस घेतली आहे. जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालयातील लाभार्थ्यांची संख्या ५१ हजार ५९१ आहे.

चौकट

आरोग्य केंद्रांत ग्रामीण भागातील दीड लाखावर लाभार्थी

ग्रामीण भागातील ५९ हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांत व उपकेंद्रांत एक लाख ५६ हजार १३७ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. लोकांनी लस घ्यावी यासाठी ग्रामपंचायतींनीही पुढाकार घेतला. दवंडी देऊन जागृती केली. त्याशिवाय इस्लामपूर, विटा, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, पलूस, शिराळा अशा निमशहरी भागातही ४० हजार ८१५ जणांचे लसीकरण झाले. विविध व्याधी असलेल्या ज्येष्ठांनी प्राधान्याने लस घेतली. त्याचा फायदा लसीकरणाचा एकूण टक्का वाढण्यात झाला.

पॉईंटर्स

लसीकरण केंद्रे - २२७

हेल्थकेअर वर्कर्स - ३७६०४

फ्रंटलाईन वर्कर्स - २१२१०

ज्येष्ठ नागरिक - १२७५५२

४५ ते ५९ वर्षांचे लाभार्थी - ७०१७९

हे सर्व लाभार्थी दोन डोस घेतलेले आहेत.

पहिला डोस घेतलेले एकूण २३९३५१

दुसरा डोस घेतलेले एकूण २०१९४

कोट

लसीकरणाला प्रतिसाद चांगला आहे. ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले केल्यापासून वेग वाढला आहे. ग्रामीण भागात प्रतिसाद चांगला आहे. ज्येष्ठांनी लसीकरणासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आहे.

- डॉ. विवेक पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी

Web Title: All-round performance of seniors in injecting corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.