गुंठेवारी समितीत सर्वपक्षीयांना समान वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:25+5:302021-03-31T04:27:25+5:30
सांगली : महापालिकेच्या गुंठेवारी समितीची नव्याने स्थापना करण्यात येत आहे. या समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला समसमान वाटा दिला ...

गुंठेवारी समितीत सर्वपक्षीयांना समान वाटा
सांगली : महापालिकेच्या गुंठेवारी समितीची नव्याने स्थापना करण्यात येत आहे. या समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला समसमान वाटा दिला जाणार आहे. शिवाय महाआघाडीला मदत करणाऱ्या अपक्ष नगरसेवक विजय घाडगे यांचाही समितीत समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला या समितीवरही वर्चस्व कायम राखण्याची चाल महापौरासह पदाधिकाऱ्यांनी खेळली आहे.
भाजपच्या सत्तेपूर्वी गुंठेवारी समिती अस्तित्वात होती; पण गेल्या अडीच वर्षांत भाजपने या समितीची स्थापना केली नाही. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने या समितीचे पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गत महासभेत गुंठेवारी समिती गठित करण्याचा ठरावही करण्यात आला. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला.
या समितीत गुंठेवारी भागातील नगरसेवकांचा समावेश केला जाणार आहे. त्यात काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी या तीन पक्षाचे प्रत्येकी ७ नगरसेवक असतील. तर अपक्ष विजय घाडगेंचाही समितीत समावेश करण्यात येणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असल्याने समितीत या दोन पक्षांचे १४ सदस्य असतील. शिवाय घाडगेंचा पाठिंबा असेल. त्यामुळे या समितीवर महाआघाडीचे वर्चस्व राहील, याची दक्षता घेतली जात आहे. त्यावर बुधवारच्या सभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
चौकट
भाजपनेही दिले पत्र
गत महासभेत गुंठेवारी समिती स्थापन करण्यास भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. ही समिती आरक्षणाचा बाजार करण्यासाठी निर्माण केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला; पण आता भाजपनेही दहा सदस्यांची नावे दिली आहेत.