मिरज : मिरजेतील सुभाषनगर येथे मद्यपी मुलाने स्वत:च्या आईवडिलांना मारहाण करून जखमी केले. याबाबत मोहन आप्पासाहेब भोसले (वय-४६) यांनी मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुलगा मिलिंद मोहन भोसले (२४) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, मोहन भोसले हे काल, सोमवारी सायंकाळी कामावर जाण्यापूर्वी घरात तोंड धुवत असताना त्यांचा मुलगा मिलिंद मद्यधुंद अवस्थेत घरी आला. वडील तोंड धुवत असताना मिलिंद याने वडिलांना ‘दारु पिऊन उलट्या करीत आहेस काय?’ असे म्हटले.यावर वडिलांनी ‘मी तुझ्यासारखा दारु पिऊन उलट्या करीत नाही’, असे म्हटल्याने मिलिंद संतापला. दारुच्या नशेत त्याने आई लक्ष्मी व वडील मोहन भोसले यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याने भोसले दांपत्य जखमी झाले. याबाबत मोहन भोसले यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून मुलगा मिलिंद भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..अन् रागातून मद्यपी मुलाने केली आई-वडिलांना मारहाण, मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:54 IST