अजितराव घोरपडे पतंगरावांच्या भेटीला
By Admin | Updated: March 14, 2016 00:16 IST2016-03-13T22:50:31+5:302016-03-14T00:16:52+5:30
राजकीय चर्चेला उधाण : सांगलीत तासभर चर्चा; दिनकर पाटील यांचीही हजेरी

अजितराव घोरपडे पतंगरावांच्या भेटीला
सांगली : पक्षीय नेत्यांबद्दल नाराज असलेले भाजप नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कॉँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांची रविवारी भेट घेतली. याचवेळी बाजार समितीच्या एका कामासाठी भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटीलही उपस्थित होते. पतंगरावांच्या सांगलीतील निवासस्थानी तासभर त्यांची बैठक चालल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपासून अजितराव घोरपडे आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. भाजपमध्ये असूनही घोरपडे पक्षीय कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. त्यांची नाराजी आता मतदारसंघासह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. यातच त्यांनी रविवारी सकाळी पतंगराव कदम यांची सांगलीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पतंगरावांशी त्यांची तासभर चर्चासुद्धा झाली. त्यानंतर भाजपचे दुसरे नेते माजी आमदार दिनकर पाटीलही त्याठिकाणी आले. दोन भाजप नेते आणि कॉँग्रेस नेत्यांमध्ये जवळपास तासभर गुफ्तगू सुरू होते. बैठकीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. बाजार समितीच्या एका कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण पतंगरावांशी चर्चा केल्याचे दिनकर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घोरपडे यांची भेट राजकीय गोटात चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते नाराज आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चाही रंगत असते. घोरपडे यांनी यापूर्वीही अनेकदा पक्ष बदलले आहेत. त्यामुळे रविवारच्या कॉँग्रेस नेत्यांच्या भेटीमुळेही जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात त्यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
४राष्ट्रवादीमधून आजी-माजी आमदार तसेच नेत्यांचा एक मोठा गट लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप, शिवसेनेत गेला होता. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना अद्याप एकही पद मिळालेले नाही. पक्षातील त्यांच्या अस्तित्वाबद्दल कार्यकर्तेच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. त्यामुळे अशा नाराज नेत्यांकडूनही अन्य पक्षांची वाट शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस नेत्यांचेही प्रयत्न सांगलीतील एका कॉँग्रेस कार्यकर्त्याने घोरपडे यांच्या कॉँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. कॉँग्रेस नेत्यांचे तसे प्रयत्न चालू असून, घोरपडे आज ना उद्या कॉँग्रेसकडेच येणार, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसनेही जिल्ह्यातील ताकद वाढविण्याच्या दृष्टीने बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.