अजितराव घोरपडे लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:23+5:302021-04-18T04:25:23+5:30
म्हैशाळ जलसिंचन योजनेची पूर्तता करून दुष्काळी जनतेच्या जीवनात नंदनवन फुलवणारे शेतकरी नेते व आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे ...

अजितराव घोरपडे लेख
म्हैशाळ जलसिंचन योजनेची पूर्तता करून दुष्काळी जनतेच्या जीवनात नंदनवन फुलवणारे शेतकरी नेते व आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अजितराव घोरपडे सरकार म्हणजे लहान कार्यकर्त्याला बळ देऊन समाजसेवेसाठी सिद्ध करणारे नेते. कार्यकर्त्याच्या अंगातील निष्ठा आणि समाजसेवेची आवड बघून कामाची संधी देणारे लोकनेते. त्यांच्याजवळ काम घेऊन येणारी व्यक्ती कामाचा सोक्षमोक्ष लावून बाहेर पडते. काम होईल की नाही असल्या झुल्यावर झुलत बसत नाहीत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल अपार प्रेम आहे.
माझ्यासारख्या महिला कार्यकर्तीला सांगली जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य व क्रीडा विभागाच्या सभापतिपदाची जबाबदारी देऊन जिल्ह्यातील तमाम महिलावर्गाचा उचित सन्मान केला आहे, असे मला वाटते.
ते केवळ जबाबदारी देऊन थांबत नाहीत, तर मार्गदर्शक सूचना देऊन जनतेची सेवा चांगल्याप्रकारे करण्याची प्रेरणाही देतात. काही चुकलेमुकले तर योग्य मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. त्यामुळे समाजकारणात व राजकारणात एक प्रकारची निर्भीडता प्राप्त होते. काम करण्याचा एक प्रकारचा आनंद मिळतो. जास्तीजास्त लोकांच्यापर्यंत कामातून पोहोचता येते. हा अनुभव गेले वर्षभर मी घेते आहे.
सभापतिपदाची जबाबदारी निश्चित झाली आणि कोविड-१९ ची महामारी सुरू झाली. अशावेळी त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. अनेकांना रुग्णवाहिका मिळवून देण्यापासून ऑक्सिजन बेडपर्यंतची व्यवस्था करण्यापर्यंत सेवा देण्याची संधी मिळाली. माझ्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व इतर नर्स स्टाफ यांच्या अथक प्रयत्नातून कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात आम्ही यशस्वी झालो. १४ व्या वित्त आयोगाकडून १४ रुग्णवाहिका १४ गावांना पालकमंत्री जयंत पाटील व विश्वजित कदम यांच्या हस्ते प्रदान करता आल्या. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड व नर्स स्टाफ नेमून कोरोनाविरुद्धची लढाई प्राथमिक स्तरावर लढण्याचे नियोजन करून सांगली, मिरजेतील आरोग्य सेवेवरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. याकामी जिल्हाधिकारी यांचेही मौलिक सहकार्य मिळाले. लोकांनी प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पाळले, तर आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकू शकतो याची खात्री वाटते.
महिलांना उद्योजक बनविण्याचा प्रयत्न अजितराव घोरपडे सरकार सातत्याने करताना दिसताहेत. महिला बचत गटांना एकत्रित करून खाद्यपदार्थ निर्मिती करून त्यांना उत्तम बाजारपेठ मिळवून देण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षित महिलावर्ग तयार करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य कसे प्राप्त होईल याकडे त्यांचे लक्ष आहे.
शिक्षण व क्रीडा विभागातील तज्ज्ञ लोकांनी जेव्हा आदर्श शाळांचे रोल मॉडेल तयार केले तेव्हा अजितराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही सूचना मला त्यामध्ये देता आल्या. गावोगावच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढली पाहिजे. शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतला पाहिजे आणि पालकांनी गावच्या प्राथमिक शाळेचे ममत्व आणि पालकत्व स्वीकारून शिक्षण चळवळ पुढे नेली पाहिजे. अशा प्रकारचे मौलिक मार्गदर्शन नेहमी अजितराव घोरपडे यांच्याकडून आम्हास मिळत असते. त्यामुळे माझ्यासारखी मध्यमवर्गीय शिक्षकांच्या कुटुंबातील एक लहान कार्यकर्ती पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषदेतील शिक्षण आरोग्य व क्रीडा विभागाच्या सभापतिपदापर्यंतचा प्रवास सुखरुपने करू शकते याचे एकमेव कारण म्हणजे अजितराव घोरपडे यांचे महिला सक्षमीकरणाचे धोरण आणि पाठबळ. अजितराव घोरपडे सरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
- सौ. आशा सुनिल पाटील
सभापती
शिक्षण, आरोग्य व क्रीडा विभाग जिल्हा परिषद.