ऐन पावसाळ्यात गटारींना मूठमाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:22+5:302021-06-10T04:18:22+5:30
सांगली : पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बनविलेल्या गटारींवर अतिक्रमण करतानाच बेकायदा माती उपसा करून येथील एका व्यावसायिकाने चक्क गटारच ...

ऐन पावसाळ्यात गटारींना मूठमाती
सांगली : पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बनविलेल्या गटारींवर अतिक्रमण करतानाच बेकायदा माती उपसा करून येथील एका व्यावसायिकाने चक्क गटारच बुजवून टाकली. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे.
शिवोदयनगरमधील ६० फुटी मुख्य रस्त्यावर पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी दोन वर्षांपूर्वी गटारीचे बांधकाम केले आहे. सध्या पावसाचे दिवस असताना या गटारींवर अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. बाळूमामा मंदिरापासून कर्नाळ रस्त्यापर्यंत ही गटार बांधली आहे. कर्नाळ रस्त्यावर एका मोठ्या बंगल्याचे बांधकाम या गटारीवरच करण्यात आले आहे. याशिवाय येथील एका व्यावसायिकाने मातीचा भराव येथील रस्त्याकडेला टाकला होता. दोन दिवसांपूर्वी ही माती अन्यत्र नेताना त्याने परिसरातील भरावाच्या मातीवरही डल्ला मारला. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
माती नेताना ही गटार पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे गटारीचे पाणी परिसरात साचून दुर्गंधी पसरली आहे. येथील नागरिकांनी बुधवारी सायंकाळी संबंधित व्यक्तीला विरोध केला. मात्र, धाकदपटशाहीने त्याने माती उपसा करून भरावाने गटार बंद केली.
रस्त्याकडेला माती, वाळू आणून टाकणे व त्याचा व्यावसाय करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात सुरू असताना त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.
चौकट
आंदोलनाचा इशारा
येथील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली असून, महापालिकेने संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.