कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांची गडचिरोलीला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:12+5:302021-09-02T04:56:12+5:30
सांगली : जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली आहे. त्याबाबतचे कृषी विभागाचे आदेश सोमवारी संध्याकाळी ...

कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांची गडचिरोलीला बदली
सांगली : जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली आहे. त्याबाबतचे कृषी विभागाचे आदेश सोमवारी संध्याकाळी प्राप्त झाले. प्रशासकीय कारणास्तव मास्तोळी यांची बदली केल्याचे आदेशात म्हंटले आहे.
मास्तोळी यांची सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगलीचे कृषी अक्षीधक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्य पद्धतीविषयी वरिष्ठ स्तरावर तक्रारी झाल्या होत्या. नातेवाईकांच्या नावावर कंपनी स्थापन करुन त्याद्वारे कृषी विभागाची खरेदी केल्याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशी झाली होती. चौकशीअंती त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी शिफारस चौकशी अधिकाऱ्यांनी केली होती. याकामी आणखी एक कंत्राटी कर्मचारीही चौकशीच्या फेऱ्यात होता. पण चौकशी अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतरही तातडीने कारवाई झाली नव्हती.
यादरम्यान, सोमवारी थेट गडचिरोलीला बदलीचे आदेश मिळाल्याने शासनाने गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले. बदलीचे कारण प्रशासकीय म्हंटले असले तरी ही एक प्रकारची कारवाईच असल्याचे मानले जाते. मास्तोळी यांनी सांगलीचा कारभार समकक्ष कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवून बदलीच्या ठिकाणी म्हणजे गडचिरोलीला तात्काळ हजर व्हावे असे आदेशात म्हंटले आहे. नियंत्रण अधिकाऱ्यांना त्यांना कोणतीही रजा मंजूर करु नये व पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करावे असेही म्हंटले आहे. गडचिरोलीमध्ये ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी याच पदावर काम करतील.