कृषी अधिकाऱ्यासह दोघे लाच घेताना जाळ्यात
By Admin | Updated: April 19, 2015 00:50 IST2015-04-19T00:50:34+5:302015-04-19T00:50:34+5:30
पलूसमध्ये कारवाई : महिला लिपिकाचा समावेश

कृषी अधिकाऱ्यासह दोघे लाच घेताना जाळ्यात
सांगली : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचा गोठा उभारणीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पलूस पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यासह महिला लिपिकास रंगेहात पकडण्यात आले.
नंदकुमार विठोबा चव्हाण (वय ४८, रा. राजेवाडी, ता. आटपाडी, सध्या सुयोग बंगला, सावरकरनगर, एसटी स्थानकामागे, विटा) व वैजयंता पोपट पाटोळे (२६, ब्राह्मणपुरी, पलूस) अशी त्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी पावणेएकला पंचायत समितीमध्ये ही कारवाई केली.
पलूसमधील शेतकऱ्याने पंधरवड्यापूर्वी शेतात जनावरांचा गोठा उभारणीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत प्रकरण मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार चव्हाण यांच्याकडे होते. त्याने प्रस्तावातील सर्व कागदपत्रे बरोबर आहेत का नाहीत, याची तपासणी करण्याची जबाबदारी वैजयंता पाटोळे हिच्याकडे सोपवली होती. प्रकरण मंजूर झाले आहे का नाही, याची चौकशी करण्यासाठी संबंधित शेतकरी दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये गेला होता. त्याने चव्हाण व पाटोळे यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांनीही प्रकरण मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितले. यामुळे शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने शासकीय पंचांना घेऊन तक्रारीची चौकशी केली. यामध्ये दोघांनीही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यानुसार शेतकऱ्याने लाचेची रक्कम शनिवारी देतो, असे सांगितले होते. तत्पूर्वी पथकाने पंचायत समितीच्या कृषी कार्यालयाबाहेर सापळा लावला होता. दुपारी पावणेएकला शेतकऱ्याकडून लाच घेताना चव्हाण व पाटोळेला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईचे वृत्त समजताच खळबळ माजली. सर्व विभागात शुकशुकाट पसरला. पथकाची सायंकाळपर्यंत कारवाई सुरू होती. रात्री उशिरा या दोघांविरुद्ध पलूस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रविवारी (दि. १९) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)