शेतीमाल उधार, शेतकरी बेजार
By Admin | Updated: November 16, 2016 23:21 IST2016-11-16T23:21:44+5:302016-11-16T23:21:44+5:30
सांगली बाजार समितीतील स्थिती

शेतीमाल उधार, शेतकरी बेजार
७0 कोटींची उलाढाल जुन्या नोटांच्या गोंधळामुळे झाली ठप्प
व्यापाऱ्यांना उधारीवर माल देऊन उत्पादक ‘सलाईन’वर
सांगली : हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांकडील सोयाबीन, मका, कांदा, गुळाची खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत, तर काही व्यापारी पैसे महिन्याने देण्याचा वायदा करत आहेत. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतकरी माल विकत आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, विष्णुअण्णा फळमार्केट, पशुधन खरेदी-विक्रीची मागील तीन दिवसात ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
सध्या सोयाबीन, मका बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत आहे. परंतु, व्यापाऱ्यांकडे चलन नसल्यामुळे ते माल खरेदी करत नाहीत. हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा हा परिणाम आहे. किरकोळ बाजारात या मालास ग्राहक नसतो. त्यामुळे शेतीमाल हातात असूनही शेतकऱ्यांकडे रोजच्या खर्चासाठी पैसे नसल्याचे चित्र आहे. आटपाडी, जत, खानापूर, कडेगाव तालुक्यात कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे. कांदा काढून तयार आहे, पण पैसे नसल्यामुळे विक्रीसाठी कांदा आणू नका, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे, तर काही शेतकऱ्यांचा कांदा उधारीवर खरेदी करत असल्याचे व्यापारी मोहन माने यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेकडून पैसेच मिळत नाहीत. आम्ही खरेदी केलेला कांदा अन्य बाजारपेठेत पाठवतो. त्या व्यापाऱ्यांकडेही नवीन चलन उपलब्ध नाही. यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. कांदा नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान नको, म्हणून आम्ही खरेदी करीत आहोत, पण हे व्यवहारही उधारीवरच सुरू आहेत. विष्णुअण्णा फळमार्केटमधील ७० ते ८० लाखांची रोजची उलाढाल ठप्प झाल्याचेही माने यांनी सांगितले.
सांगली मार्केट यार्डातील रोजचे पंधरा ते वीस कोटींचे अन्नधान्य, सोयाबीन, गूळ, मका खरेदीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या किरकोळ व्यवहार व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावरच सुरू असल्याचे चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष गोपाळ मर्दा यांनी सांगितले.
बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार, विष्णुअण्णा फळमार्केट येथील ३५ टक्के, पशुधन विक्री बाजारामधील ४० टक्के आणि सांगली मार्केट यार्डातील ५० टक्के उलाढाल बंद असल्याचे सांगण्यात आहे. हजार-पाचशे रूपयांचे चलन बंद केल्यामुळे तीन्ही बाजारपेठेतील तीन दिवसांमध्ये ७० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकरी, व्यापारी व ग्राहकांकडे चलन फिरते राहिल्याशिवाय उलाढाल वाढणार नाही, अशीच परिस्थिती आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन चलन हवे तेवढे देण्याची व्यवस्था केली पाहिजे, अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.(प्रतिनिधी)
हमालांची उपासमार
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, विष्णुअण्णा फळमार्केट, गणपती पेठ येथील उलाढालीवरच हमालांच्या हाताला काम मिळत असते. परंतु, गेल्या चार दिवसांपासून सांगली बाजारपेठेतील उलाढालच घटली आहे.
त्यामुळे हमालांच्या हातालाही काम नसल्यामुळे त्यांना रोज रिकाम्या हातानेच घरी परत फिरावे लागत आहे. रोजच्या कमाईवरच काही हमालांचा संसाराचा गाडा चालू असतो.
परंतु, चार दिवसात त्यांच्या हातालाच काम नसल्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. बाजारपेठ सुरळीत कधी होणार आणि आपल्या हाताला काम कधी मिळणार?, असा प्रश्न हमालांना भेडसावत आहे.