रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:59+5:302021-05-19T04:26:59+5:30
विटा : कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले असताना, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसह रासायनिक खतांच्या किमतींत भरमसाट वाढ करून ...

रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन
विटा : कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले असताना, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसह रासायनिक खतांच्या किमतींत भरमसाट वाढ करून शेतकरी व सर्वसामान्य जनतेला संकटात टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मंगळवारी खानापूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने दिला.
यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
सध्या कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात आले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ही गंभीर परिस्थिती संपूर्ण देशावर ओढविली असताना केंद्र सरकारने अगोदर पेट्रोल-डिझेलची भाववाढ केली. आता रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढवून शेतकऱ्यांना धक्का दिला आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, यासाठी मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार ऋषीकेत शेळके यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खानापूर विधानसभा अध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, खानापूर विधानसभा युवक अध्यक्ष हरिभाऊ माने, विटा शहराध्यक्ष नितीन दिवटे, कार्याध्यक्ष विशाला पाटील, युवक उपाध्यक्ष विनायक कचरे, सचिन मेटकरी, संतोष गायकवाड, सतीश बाबर, किरण भगत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - १८०५२०२१-विटा-एन.सी.पी. : विटा येथे रासायनिक खतांच्या किमती कमी करण्याबाबत निवेदन खानापूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना देण्यात आले. यावेळी सुशांत देवकर, किसन जानकर, हरिभाऊ माने, विनायक कचरे, नितीन दिवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.