अग्रणीचा जिल्ह्यातील प्रवास ५५ किलोमीटरचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:17+5:302021-04-04T04:26:17+5:30
अग्रणीचा उगम खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो. तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाली आहे, असे सांगण्यात येते. या ...

अग्रणीचा जिल्ह्यातील प्रवास ५५ किलोमीटरचा
अग्रणीचा उगम खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो. तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाली आहे, असे सांगण्यात येते. या नदीच्या खोऱ्यात सात पाणलोट क्षेत्रे आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी असे तालुके येतात. या नदीची एकूण लांबी ६८ किलोमीटरची असून महाराष्ट्र १०४ आणि कर्नाटकातील तीन गावे ह्या खोऱ्यात येतात. अग्रणी नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. ती अथणी तालुक्यातील हुल्लगबल्ली गावात जाऊन कृष्णा नदीस मिळते. यादरम्यान महांकाली नावाची २२.५ किलोमीटर लांबीची उपनदीही अग्रणीला येऊन मिळते.
राज्य शासन, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले आहे. हे पात्र खानापूर तालुक्यात २२ किलोमीटर आहे. उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे आदी गावांतील स्थानिकांनी या कार्यात सक्रिय श्रमदान दिले.
चौकट
केंद्र शासनाचा पुरस्कार
अग्रणीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण केले. दीडशे वर्षांनतर ती पुन्हा प्रवाहित झाली व २८ हजार शेतकऱ्यांना फायदा झाला. याची प्रेरणा घेऊन कर्नाटकातील तीन गावांनी लोकवर्गणीतून हे कार्य पुढे चालवले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दलच केंद्र सरकारकडून अग्रणीच्या कार्याला पुरस्कार मिळाला आहे.