सांगलीकरांना साथीच्या रोगांचा ताप
By Admin | Updated: October 6, 2015 00:37 IST2015-10-05T23:21:30+5:302015-10-06T00:37:18+5:30
रोगांच्या साथी : मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लूचा वाढता प्रसार; अतिसाराच्या रुग्णांतही लक्षणीय वाढ--लोकमत विशेष

सांगलीकरांना साथीच्या रोगांचा ताप
शीतल पाटील -सांगली --परतीच्या पावसाने शहरवासीय एकीकडे सुखावले असले तरी, साथीच्या रोगांच्या वाढत्या प्रसारामुळे चिंतेतही वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला अशा दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक नागरिकांना ताप चढला आहे. त्यात स्वाइन फ्लूने सातजण दगावल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. हगवण, अतिसाराच्या रुग्णातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेचीही आता पळापळ सुरू झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यामते वातावरणात झालेले बदल जीवाणूंच्या वाढीस पोषक असतात. यामुळे व्हायरल फीवरचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. सर्दी, खोकला, ताप या साथीचे जानेवारी ते सप्टेंबरअखेर ९५७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या कालावधित कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, हीच एकमेव जमेची बाजू आहे.
गेल्या आठ महिन्यात गॅस्ट्रोचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. मिरजेत गॅस्ट्रोसदृश साथीने काही महिन्यांपूर्वी थैमान घातले होते. त्यानंतर महापालिकेने काही ठोस उपाययोजनाही आखल्या होत्या. गटारीतून जाणारे नळ कनेक्शन बदलण्यात आले असून काही ठिकाणी मुख्य पाईपलाईनच दुसरी टाकण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात गॅस्ट्रोचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान हगवणीचे १३०३, अतिसाराचे १०५९ रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाच्या साथीनेही काही काळ डोके वर काढले होते. आतापर्यंत १३ जणांना मलेरिया झाला होता. त्यात शहराबाहेरील सहा जणांचा समावेश आहे.
गरोदर महिलांना स्वाइनची लस
स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना स्वाइन होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे गर्भवती महिलांना स्वाइनची लस देण्यात येणार आहे. सध्या पालिकेकडे १०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तीन महिन्यावरील गर्भवती महिलेला ही लस दिली जाणार असून ती ऐच्छिक असल्याचे डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले.
नागरिकांनी घेतली स्वाइनची धास्ती
गेल्या पंधरा दिवसांत शहरात स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला आहे. या साथीमुळे सात जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. शासकीय रुग्णालयात आतापर्यंत ३० संशयित दाखल झाले होते. त्यापैकी २० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून दहा जणांना स्वाइनची लागण झाली होती. अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. खासगी रुग्णालयाकडून या रुग्णांची माहिती महापालिकेला दिली जात नाही. अगदी स्वाइन फ्लूच्या शेवटच्या टप्प्यात रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
डेंग्यूचे ५४ संशयित
शहरात डेंग्यूचे ५४ संशयित शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. पण त्यांचा अहवाल निगेव्हिट आल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. डेग्यूचे डास हे स्वच्छ साचलेल्या पाण्यात निर्माण होतात. स्वच्छ साचलेले पाणी हे घरात मोठ्या प्रमाणात असते. यामुळे बहुतांश घरात डासांची पैदास होत असते. त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. कमी पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. टाक्या, फ्लॉवरपॉट, मनी प्लँट इत्यादी ठिकाणी पाण्याचा साठा असतो. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे कुलकर्णी म्हणाल्या.