जागेच्या वादातून सांगलीत वृद्धेचा खून
By Admin | Updated: March 8, 2015 00:21 IST2015-03-08T00:18:28+5:302015-03-08T00:21:15+5:30
पाचजणांना अटक : मृतदेह विशाळगडावर पेटविला; हाडाचे अवशेष जप्त

जागेच्या वादातून सांगलीत वृद्धेचा खून
सांगली : गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चंद्राबाई बाबूराव लंबे (वय ७५, रा. मोती चौक, बापट मळ्याजवळ, सांगली) या वृद्धेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात विश्रामबाग पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. जागेच्या वादातून त्यांचा पाच संशयितांनी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील जंगलात पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयितांनी मृतदेह पेटवून दिलेल्या ठिकाणावरून चंद्राबाई यांच्या हाडांचे अवशेष जप्त केले आहेत. रात्री उशिरा त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये मुख्य संशयित अमित बाळू शिंदे (वय २५), सुनील सिद्धाप्पा रेड्डी (२३), योगेश अशोक सोनुले (२२), सुरेश परशुराम शिरगूर (१९, चौघे रा. मोती चौक) व प्रदीप आप्पासाहेब सौदे (२३, महात्मा फुले कॉलनी, कुपवाड रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे.
याबाबतची माहिती कशी, चंद्राबाई यांची चांदणी चौकात तीन गुंठ्याची जागा आहे. त्या मोती चौकात मुलगा व सुनेसोबत राहत होत्या. दोन वर्षांपूर्वी संशयित शिंदे याने त्यांची ही जागा खरेदी केली होती. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी शिंदेकडे पुरेशी रक्कम नव्हती. यामुळे त्याने थोडीफार रक्कम देऊन उर्वरित (पान १० वर)रकमेपोटी १३ तोळे सोन्याचे दागिने दिले होते. दरम्यानच्या काळात शिंदेला पैशांची अडचण होती. यासाठी त्याने चंद्राबार्इंकडून दागिने परत घेतले होते. दागिने परत देण्यासाठी चंद्राबार्इंनी तगादा लावला होता. मात्र, तो देत नव्हता. यामुळे चंद्राबार्इंनी त्याला जागेचा ताबा दिला नव्हता. यासंदर्भात त्याने न्यायालयात दावाही दाखल केला आहे. या जागेत त्यांनी भाडेकरू ठेवले होते. दोन महिन्यांपूर्वी शिंदेने या भाडेकरूस मारहाण करून तेथून हाकलून लावले होते.
चंद्राबाई दागिने परत देण्यासाठी तगादा लावत होत्या, जागेचा ताबाही देत नव्हत्या, तसेच त्या बाहेर लोकांना माझी फसवणूक करून जागा घेतल्याचे सांगत होत्या. यामुळे शिंदे त्यांच्यावर चिडून होता. २७ फेब्रुवारीला त्याने रात्री बाराला चार साथीदारांना घेऊन चंद्राबार्इंचे घर गाठले. जागेच्या विषयावर बोलायचे आहे, असे सांगून त्यांना उठविले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. मध्यरात्री त्यांनी मोटारीतून (एमएच ०९ ई २२२३) चंंद्राबार्इंचा मृतदेह विशाळगडला नेला. तेथील आंबा चौकात परिरसरात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची पाहणी केली. तेथून काही अंतरावर जंगलात त्यांनी मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा बेत आखला. यासाठी जंगलातील लाकडे व पालापाचोळा गोळा केला. मृतदेहाची राख होईपर्यंत संशयित थांबले. त्यानंतर राख व हाडाचे अवशेष तिथे जवळच असलेल्या तलावात फेकून देऊन संशयित सांगलीत परतले होते.
खुनाची कबुली
चंद्राबाई रातोरात गायब झाल्याने त्यांचा मुलगा प्रकाश यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांच्या तपासात चंद्राबार्इंचे अमित शिंदे याने जागेच्या वादातून अपहरण केल्याची माहिती मिळाली होती. त्याचा शोध सुरु होता. मात्र २७ फेब्रुवारीपासून तोही गायब असल्याची माहिती मिळाली. काल, शुक्रवारी रात्री तो विश्रामबाग पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने साथीदारांच्या मदतीने खुनाची कबुली दिली. आज, शनिवारी पहाटे त्याच्या चार साथीदारांना अटक केली.
विशाळगडला रवाना
संशयितांना घेऊन पोलीस निरीक्षक के. एस. पाटील यांचे पथक शनिवारी सकाळी विशाळगडला रवाना झाले होते. संशयितांनी मृतदेह पेटवून दिलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्याचा पंचनामा करण्यात आला. तसेच तलावात फेकून दिलेले हाडाचे अवशेषही जप्त केले. दिवसभर ही कारवाई सुरु होती. सायंकाळी पथक सांगलीत दाखल झाले.
गोड बोलून काढला काटा
जागेचा वाद मिटावा, जागेचा ताबा मिळावा, चंद्राबार्इंनी न्यायालयातील दावा मागे घ्यावा, यासाठी शिंदे याने गेल्या दोन महिन्यापासूनन चंद्राबार्इंशी जवळीक साधली होती. त्यांना स्वत:च्या मोटारीतून फिरायला न्यायचा. त्यांना गोडधोड जेवायला घालून जागेचा विषय काढायचा. मात्र चंद्राबाई दावा मागे घेण्यास तयार नव्हत्या. यामुळे त्याने साथीदारांच्या मदतीने त्यांचा संपविण्याचा कट रचला.