बाजारपेठ सोमवारी खुली न झाल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:45+5:302021-06-29T04:18:45+5:30
सांगली : जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. पण त्याची कुठेच अंमलबजावणी होताना दिसत नाही. ८० टक्के व्यवहार ...

बाजारपेठ सोमवारी खुली न झाल्यास आंदोलन
सांगली : जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. पण त्याची कुठेच अंमलबजावणी होताना दिसत नाही. ८० टक्के व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात प्रशासनाने कोरोनाचा पाॅझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, त्यानंतर सोमवार ५ पासून सर्वच व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा व्यापाऱ्यांच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिला.
शहा म्हणाले की, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे. पण प्रशासनाने या बदल्यात कारवाईची कोणतीही कसर ठेवलेली नाही. लाखो रुपयांचा दंड वसूल केला. अर्धवट लॉकडाऊनमुळे प्रादुर्भाव कमी होणार नाही.
लाॅकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना कसलीही मदत दिलेली नाही. स्थानिक करही माफ केले नाही. उलट विजेचे कनेक्शन तोडले जात आहेत. वातानुकूलित कार्यालयात बसून प्रशासन आदेश काढत आहे. प्रत्यक्षात जमिनीवर काय स्थिती आहे, याची जाणीवही प्रशासनाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचा संयम सुटत आहे. प्रशासनाने तातडीने जिल्हा परत स्तर ३ मध्ये आणून व्यापार सुरळीत सुरू करण्यास मुभा द्यावी. या आठवड्यात प्रशासनाने उपाययोजना करून कोरोनाचा संसर्ग रोखावा, त्यानंतरही कडक निर्बंध लागू केल्यास व्यापारी संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असा इशारा शहा यांनी दिला.