नाराजीच्या विस्तवाने राष्ट्रवादीचे घर पेटले
By Admin | Updated: August 11, 2015 00:38 IST2015-08-11T00:38:44+5:302015-08-11T00:38:44+5:30
सांगली बाजार समिती : काँग्रेसचे बाहुबल सिद्ध

नाराजीच्या विस्तवाने राष्ट्रवादीचे घर पेटले
अंजर अथणीकर-सांगली पक्षांतर्गत संघर्षाच्या विस्तवाने राष्ट्रवादीच्या घराला आग लागली आणि भरल्या बाजारात जयंतरावांच्या सैन्याला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी आणि नेत्यांमधील अति आत्मविश्वास या गोष्टींचा अचूक फायदा घेत काँग्रेसने बाजार समितीमध्ये परिवर्तनाचा झेंडा रोवला.
मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात कार्यक्षेत्र असणारी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी राज्यातील महत्त्वाची संस्था आहे. वार्षिक सुमारे तेराशे कोटीची उलाढाल असणारी व सध्या तीस कोटीहून अधिक ठेव असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असावी, यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील यशानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या निवडणुकीतही तोच फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतला. भाजप, राष्ट्रवादी व मदन पाटील गट एकत्रित आला, मात्र माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना सामील करून घेण्यात त्यांना अपयश आले. मध्यवर्ती बँकेत डावलल्याने त्यांची नाराजी होती. तिकीट वाटपातही आजी, माजी संचालकांना पूर्णपणे डावलल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.
कवठेमहांकाळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष भानुदास पाटील, माजी सभापती एम. के. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले, बाळू पाटील, आप्पासाहेब पाटील, शिरढोणचे माजी सरपंच शिवाजी कदम, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती जालिंदर देसाई, शिवाजी कदम, जतमधील धनगर समाजाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती आकाराम मासाळ असे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवारीच्या प्रश्नावरून नाराज होते. या नाराज मंडळींना एकत्रित आणण्यात काँग्रेसमधील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यातच कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. इतकी नाराजी वाढत असतानाही जयंत पाटील यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आर. आर. पाटील यांचा राष्ट्रवादीमधील गटही नाराज होता. निवडणुकीच्या आधी पाच दिवस या नाराज गटाने मेळावा घेऊन उघडपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.
नेत्यांकडून ही नाराजी दुर्लक्षित झाल्याने नाराजीत भर पडली. त्यांनी मोट बांधून काँग्रेस आघाडीचा प्रचार केला. पतंगरावांनी नाराजांना सोबत घेऊनच काम करण्याचे आश्वासन दिले. त्यातच शेवटच्या टप्प्यात जयंतरावांनी निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. भाजप नेत्यांनीही म्हणावा तितका जोर लावला नाही. सोसायटी, ग्रामपंचायती संख्येने अधिक ताब्यात असूनही विस्कळीत प्रचारामुळे काँग्रेस आघाडीचा विजय सुलभ झाला.
मदन पाटील यांचा गड शाबूत
या निवडणुकीत मदन पाटील यांचा गट शाबूत असल्याचे दिसून आले आहे. मदन पाटील हे स्वत: या निवडणुकीत सहज निवडून आले. यासाठी काँग्रेस आघाडीनेही समझोत्याचे राजकारण केले. शिवाय सहकारी गटातून राष्ट्रवादी आघाडीतून निवडून आलेले वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील हेही मदन पाटील गटाचेच मानले जातात. व्यापारी गटातून निवडून आलेले शीतल पाटील, मुुजीर जांभळीकर हे मदन पाटील यांनाच मानणारे आहेत. मात्र त्यांनी सध्या तरी अपक्ष राहण्याची भूमिका घेतली आहे.