अधीक्षकांवर कठोर कारवाईची मागणीरिपाइं आक्रमक
By Admin | Updated: December 2, 2014 00:19 IST2014-12-01T23:30:55+5:302014-12-02T00:19:23+5:30
: गटविकास अधिकाऱ्यांंना निवेदन-लोकमतचा प्रभाव

अधीक्षकांवर कठोर कारवाईची मागणीरिपाइं आक्रमक
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील शासकीय वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय व दबाव टाकणाऱ्या वसतिगृह अधीक्षकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज (सोमवार) रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने यांनी दिला आहे.
कवठेमहांकाळ येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थी तणावात राहतात, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झाले होते. यावर तालुक्यात विविध संघटनांकडून अधीक्षकांविरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आज (सोमवार) कवठेमहांकाळ रिपाइंच्यावतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना शेकडो कार्यकर्त्यांसह या वसतिगृहाच्या अधीक्षकांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यात यावा, जेवणातील भेसळ थांबवावी, विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये, त्यांच्यावर दबावाचा वापर अधीक्षकाने करू नये, स्टेशनरी पुरेशी, सर्व पुस्तके व विद्यावेतन वेळेवर देण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनाच्या प्रती समाजकल्याण आयुक्त, पुणे व राज्याचे समाजकल्याण मंत्री यांना पाठविण्यात आल्या असून, या अधीक्षकांवर कारवाई न केल्यास रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही माने यांनी दिला आहे. या निवेदनावर सूरज वाघमारे, मिलिंद आठवले, संजय वाघे, राजू बनसोडे, जितेंद्र चंदनशिवे, गुलाबराव साबळे, किरण बनसोडे यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)