ऐनवेळच्या ठरावाविरोधात आयुक्तांना साकडे
By Admin | Updated: April 28, 2015 00:32 IST2015-04-27T23:17:26+5:302015-04-28T00:32:31+5:30
महापालिका : सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांनी केली ठराव रद्दची मागणी

ऐनवेळच्या ठरावाविरोधात आयुक्तांना साकडे
सांगली : महापालिकेच्या सभेत ऐनवेळच्या विषयात घुसडण्यात आलेले सर्व ठराव रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांनी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे केली. महापौर विवेक कांबळे यांच्या कारभाराविरोधातील नाराजीतून त्यांनी आयुक्तांना याबाबतचे साकडे घातले.
महापालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधाऱ्यांच्या दोन गटात जोरदार वाद सुरू झाला आहे. महापौर विवेक कांबळे यांचा एक गट, तर गटनेते किशोर जामदार यांचा दुसरा गट आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू केली आहे. महापौरांनी गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मिरज पॅटर्नचा प्रकार महापालिकेत चालू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. दुसरीकडे महापौर कांबळेच किती भ्रष्ट आहेत, याचे पुरावे जामदार गट देत आहे. सभापती मेंढे यांनी काही दिवसांपूर्वी कांबळे यांच्या काळात झालेल्या ऐनवेळच्या ठरावांची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
या ठरावांविरोधात आता महापौरविरोधी गटाने आंदोलन उभारले आहे. सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोमवारी आयुक्तांकडे सादर करण्यात आले. पंधरा नगरसेवकांचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. ऐनवेळचे सर्व ठराव बेकायदेशीर आहेत, त्यामुळे ते विखंडित करण्यात यावेत, अशापद्धतीने सदस्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ऐनवेळच्या ठरावांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे.
आयुक्त कारचे यांनी सांगितले की, कायदेशीर बाबी पडताळून घेण्यात येतील. त्यानंतर ठरावांबाबत निर्णय घेतला जाईल. सभागृहाचे तसेच महापालिकेचे कामकाज या विषयावर नगरसेवकांची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेवक दिलीप पाटील, निर्मला जगदाळे, बबिता मेंढे, शेवंता वाघमारे, सुनीता खोत, संतोष पाटील आदी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मदन पाटील यांची बैठक
सत्ताधारी गटात गोंधळ सुरू असल्याने काही तटस्थ नगरसेवकांनी, याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार मदन पाटील यांनी येत्या दोन दिवसात महापालिकेत बैठक घेऊन या वादावर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. नेत्यांच्या बैठकीतही हे दोन गट आमने-सामने येणार असल्याने याठिकाणीही वादावादी होण्याची चिन्हे आहेत.
टक्केवारीसाठीच महापालिकेत वाद : पतंगराव कदम
महापालिकेतील संघर्षाबाबत सत्ताधारी गटाचे नेते आ. पतंगराव कदम म्हणाले की, टक्केवारीसाठीच महापालिकेत सध्या वाद सुरू आहेत. लोक हे सर्व पाहात आहेत. ज्या विश्वासाने लोकांनी सत्ता दिली आहे, त्याच विश्वासाने कारभार करण्याची गरज आहे. त्यांचा अपेक्षाभंग करू नये. अन्यथा ज्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतले, तेच तुम्हाला खाली खेचू शकतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. सत्ताधारी गटाचा नेता म्हणून लक्ष घालणार आहे. लवकरच सत्ताधारी गटातील नगरसेवक बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी वाद घालण्यापेक्षा शहरातील विकास कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.