तांबोळी-शिंदे यांच्यात पुन्हा वाद
By Admin | Updated: June 16, 2016 00:56 IST2016-06-15T23:15:04+5:302016-06-16T00:56:21+5:30
राष्ट्रवादी कार्यालयात प्रकार : नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वादाला पूर्णविराम

तांबोळी-शिंदे यांच्यात पुन्हा वाद
सांगली : युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी आणि जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांच्यात मंगळवारच्या बैठकीत झालेल्या वादाचे पडसाद बुधवारी पुन्हा उमटले. प्रचंड वादावादी झाल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीने या वादाला पूर्णविराम मिळाला.
सांगलीच्या राष्ट्रवादी कार्यालयात मंगळवारी युवक राष्ट्रवादीची बैठक झाली होती. या बैठकीस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मोहिते-पाटील निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमक्षच शिंदे व ताजुद्दीन तांबोळी यांनी भाषणातून एकमेकांना टोमणे मारले होते. हाच वाद पुन्हा बुधवारी दुपारी उफाळून आला.
बुधवारी सांगलीच्या जिल्हा कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहराध्यक्ष सागर घोडके, ताजुद्दीन तांबोळी, वैभव शिंदे, सचिव मनोज भिसे एवढे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. तांबोळी यांचे आगमन होताच शिंदे यांनी त्यांच्याकडे बोट करीत, ‘तुम्ही मला बोलायचा काय संबंध? जाहीर बैठकीत पुन्हा असे बोलाल तर याद राखा’, अशा शब्दात संताप व्यक्त केला. त्यानंतर तांबोळी यांनीही त्यांना ‘हात खाली करून बोलायचे. वादाची सुरुवात तुम्हीच केली होती. वयाचा विषय काढून तुम्ही डिवचले नसते, तर मलाही बोलण्याचे कारण नव्हते. मान तुम्ही राखला नाही, तर आम्हीसुद्धा राखणार नाही.’ अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.
दोन्ही पदाधिकाऱ्यांचा आवाज वाढत गेला. जवळपास दहा मिनिटे हा वाद अन्य पदाधिकाऱ्यांसमोर सुरू होता. संजय बजाज यांनी मध्यस्थी केली व दोन्ही पदाधिकाऱ्यांना शांत केले. पक्षातील किरकोळ वादाला जाहीर स्वरुप प्राप्त झाले की, सर्वांचीच बदनामी होते. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी संयमाने घ्यावे. एकमेकांच्या पदांवरून टीका करण्यापेक्षा दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, अशी सूचना बजाज यांनी केली. त्यानंतर शिंदे व तांबोळी शांत झाले.
हा वाद मिटल्याचे जाहीर करून वादावर पडदा टाकण्यात आला. तरीही दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर या वादाचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत होते.
गेल्या काही दिवसांपासून पक्षाला वादाचे ग्रहण लागले आहे. सुरुवातीला युवक कार्यकारिणीच्या निवडींवरून वाद निर्माण झाले होते. आता बैठकांमधूनही याचे पडसाद उमटत आहेत. विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांच्यासमोर मारामारीची घटना घडली होती. त्यानंतर युवकच्या बैठकीत टोमणेबाजीतून वादाची ठिणगी पडली आहे. (प्रतिनिधी)
दोन गट : कुरघोड्यांचे राजकारण
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी सध्या दोन गटात विभागल्याचे चित्र आहे. दोन्ही गटांचे पदाधिकारी एकमेकांच्या गटावर लक्ष ठेवून आहेत. एकमेकांवर कुरघोड्या करताना त्यांना सार्वजनिक स्वरुप देण्याचा प्रयत्न आता दोन्ही गटांकडून सुरू झाला आहे.