जत शहरात पुन्हा अतिक्रमणे हटविली
By Admin | Updated: July 1, 2014 00:40 IST2014-07-01T00:34:54+5:302014-07-01T00:40:14+5:30
पालिकेची कारवाई : मुख्य बाजारपेठने घेतला मोकळा श्वास

जत शहरात पुन्हा अतिक्रमणे हटविली
जत : शहरातील मुख्य बाजारपेठेतील जत नगरपरिषद ते गांधी चौक रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण आज (सोमवार) सकाळपासून पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरुवात झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
काही व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर छत मारून किंवा कट्टा तयार करून त्यावर अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण पादचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत होते. याशिवाय ग्राहकांना आपल्या वाहनाचे पार्किंग करून दुकानात जाताना अडचण निर्माण होत होती. याबाबत नागरिकांकडून प्रशासनाकडे सतत तक्रारी होत होत्या. प्रशासनाने त्याची दखल घेऊन आणि रविवारी दुपारी सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पालिका अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी पंडित पाटील यांची भेट घेऊन अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात सात दिवसांची मुदत द्या, आम्ही स्वत:हून अतिक्रमण काढून घेतो, अशी विनंती केली होती. परंतु हा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत तहसीलदार दीपक वजाळे यांच्यासमोर घेण्यात आला आहे. यामध्ये मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ही कारवाई थांबवता येणार नाही, असे स्पष्टपणे त्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकानांसमोरील छपऱ्या व कट्टा काढून घेतला, तर काही ठिकाणचे अतिक्रमण नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काढले.
मुख्य बाजारपेठेतील नगरपालिकेच्या मालकीच्या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात येणार आहे. मोहीम पूर्ण होईपर्यंत ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार आहे. त्यासाठी मुख्य बाजापेठेतील मार्गावर मार्किंग करण्यात आले आहे, असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)