खुनाच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सक्रिय
By Admin | Updated: February 26, 2015 00:07 IST2015-02-25T23:38:01+5:302015-02-26T00:07:37+5:30
पहाटे छापे : मिरजेमध्ये कॅरम क्लब; गुन्हेगार रडारवर

खुनाच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सक्रिय
मिरज : मिरजेत अक्रम शेख याच्यावर गोळ्या झाडून झालेल्या खुनानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. आज (बुधवारी) भल्या पहाटे हडको व मराठे मिल चाळीत पोलिसांनी झडती घेऊन हत्याऱ्यांचा शोध घेतला. शहरातील कॅरम क्लब व गुन्हेगारांच्या ग्रुपची यादी तयार करण्यात येत आहे.
मिरजेत १९८५ मध्ये गोळ्या झाडून अशीच खुनाची घटना घडली होती. त्यानंतर ही खुनाची घटना घडल्याने मिरजेतील वाढत्या गुन्हेगारीची चर्चा सुरू आहे. शहरात दोन गटात संघर्षातून मारामाऱ्या व राजकारण्यांच्या मध्यस्थीने घडलेल्या तडजोडीच्या प्रकारामुळे पोलिसात गुन्हे दाखल होत नाहीत. याचे पर्यवसान खुनी संघर्षात होत असल्याने पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाण्यात तडजोडी, मध्यस्थी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगार गावठी पिस्तूल बाळगून वावरत असल्याने, शस्त्रांचा शोध घेण्यासाठी आज म्हाडा कॉलनी व मराठे मिल चाळीत भल्या पहाटे कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. झडतीत आक्षेपार्ह काही सापडले नाही. मात्र संशयास्पद ठिकाणी वारंवार झडती घेऊन हत्यारे शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. शहरातील गल्लीबोळात सुरू असलेल्या कॅरम क्लबमध्ये तरूणांची गर्दी असते. कॅरम क्लबमध्ये गुन्हेगार, अवैध व्यावसायिकांची उठ-बस आहे. कॅरम क्लबमध्ये यापूर्वी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. बहुसंख्य गुन्हेगारांचे कॅरम क्लब असल्याने त्यांची यादी तयार करण्यात येत आहे. काही गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांनी शहराच्या विविध भागात तरुणांचे ग्रुप तयार केले असून, वारंवार डिजिटल फलक झळकवून राजकीय नेत्यांशी सलगी करणाऱ्या अशा ग्रुपची पोलीस माहिती घेत आहेत.
शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर पोलिसांनी उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून वरातीमागून घोडे... अशा या प्रकाराबाबत चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)
मटका चालकांत मारामाऱ्या
मिरज हे मटका व्यवसायाचे प्रमुख केंद्र होते. गेली दहा वर्षे बंद असलेला मटका व्यवसाय गेल्या काही महिन्यात पुन्हा चोरून सुरू झाल्यानंतर, मटका व्यवसायातील जुने व नवे असा संघर्ष सुरू आहे. मटका व्यवसायातील संघर्षातून पुन्हा हाणामाऱ्या होण्याची शक्यता असल्याने मिरजेतील मटका व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश विशेष पथकाला देण्यात आले आहेत