...अखेर ‘साहेब’ बनले आमदार!

By Admin | Updated: October 20, 2014 00:40 IST2014-10-19T23:22:17+5:302014-10-20T00:40:31+5:30

जतमध्ये तीनवेळा भाजप विजयी : शिवसेनेसह आठ उमेदवारांची अनामत जप्त

After all, the 'Sir' became the MLA! | ...अखेर ‘साहेब’ बनले आमदार!

...अखेर ‘साहेब’ बनले आमदार!

जत : जत विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विलासराव जगताप अटीतटीच्या सामन्यात १७ हजार ६९८ मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाचे विक्रम सावंत यांना ५५ हजार १८७, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रकाश शेंडगे यांना ३० हजार १३० मते, तर जगताप यांना एकूण ७२ हजार ८८५ मते मिळाली आहेत. त्यांच्या विजयामुळे येथे सलग तीनवेळा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होऊन भाजपने हॅट्ट्रिक साधली आहे. परंतु तीनही वेळा वेगवेगळे उमेदवार निवडून आले अहेत. जगताप यांच्या विजयामुळे येथे जातीचा फॅक्टर यशस्वी होत नाही, हे मतदारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.शिवसेना, मनसे, बसप, शेकाप व इतर चार अपक्ष उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. आज (रविवार) सकाळी आठ वाजता कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात झाली. साडेआठ वाजता पोस्टाने आलेले मतदान मोजण्यास सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा निकाल प्रथम सकाळी नऊ वाजता जाहीर करण्यात आला. दुपारी बारा वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. मतमोजणीच्या एकूण २१ फेऱ्या झाल्या. मतमोजणी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रकाश शेंडगे व राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम सावंत उपस्थित नव्हते. त्यांचे प्रतिनिधी व इतर उमेदवार उपस्थित होते. शेंडगे मतमोजणीच्या दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी कक्षात आले. त्यानंतर ते शेवटपर्यंत उपस्थित होते. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विलासराव जगताप यांना शुभेच्छा देऊन ते निघून गेले.
पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत विलासराव जगताप यांचे मताधिक्य हळू-हळू वाढत गेले. तिसऱ्या फेरीस त्यांचे मताधिक्य काही प्रमाणात कमी झाले होते. त्यानंतर सतत मताधिक्य वाढत गेल्यामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. त्यामुळे जत शहर आणि परिसरात गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी सायंकाळपर्यंत सुरू होती.पोस्टल मतदान एक हजार तीनशे सोळा इतके होते. त्यापैकी ११९६ मते वैध ठरविण्यात आली आहेत. निकालाची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेंद्र भटनागर यांच्याहस्ते विलासराव जगताप यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विजयाच्या घोषणा दिल्या.
शिवाजी पुतळा जत येथून विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. जत शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, नगरसेवक उमेश सावंत, महादेव कोळी, इकबाल गवंडी, नगराध्यक्ष रवींद्र साळे, प्रमोद सावंत, संजीवकुमार सावंत, गौतम ऐवळे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: After all, the 'Sir' became the MLA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.