आफ्रिकन चातक पक्षी आमणापूरात कृष्णाकाठावर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:28+5:302021-05-19T04:27:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याचा सांगावा देणाऱ्या आफ्रिकन चातक पक्ष्याचे पलूस तालुक्यातील कृष्णाकाठी आगमन ...

African Chaatak birds arrive at Krishnakatha in Amanapur | आफ्रिकन चातक पक्षी आमणापूरात कृष्णाकाठावर दाखल

आफ्रिकन चातक पक्षी आमणापूरात कृष्णाकाठावर दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी : शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याचा सांगावा देणाऱ्या आफ्रिकन चातक पक्ष्याचे पलूस तालुक्यातील कृष्णाकाठी आगमन झाले आहे. आमणापूर परिसरात त्याचे दर्शन होत आहे.

मे महिन्याच्या उत्तरार्धात हा पाहुणा चातक पक्षी भारतात येतो. काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराला शोभावा असा काळा तुरा असतो. आफ्रिकन चातक पक्ष्याचा साळुंकीएवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो. हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा चातकपक्षी सहज ओळखता येतो. शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी व पाय काळसर निळे असतात. नर व मादी सारखेच दिसतात. हे एकेकटे किंवा त्यांची जोडी असते.

तौक्ते चक्रीवादळाने आलेल्या पावसाबरोबर हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील आमणापूर कृष्णाकाठावर दाखल झाला आहे. कोकीळा, पावशा, कारूण्य कोकीळा, बुलबुल, रॉबीन या गाणाऱ्या पक्ष्यांसोबतच चातकाच्या सुरांची रानमैफल कृष्णाकाठावर रंगते आहे. या चातक पक्ष्याचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे, अशी माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली. चातकाची वीण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यात भ्रूण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात घालते. अंडी घालण्यासाठी ती सकाळची वेळ निवडते. ती सरळ सातभाईच्या घरट्याजवळ जाते. सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो व काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यात अंडे घालता येते. अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यांमध्येच चातकाचे पिल्लू असते. आपल्या पिलांबरोबर सातभाई चातकाच्या पिलाला वाढवितात. चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो. त्यामुळे तो सहज ओळखू येत असतो. हा पक्षी जैव नियंत्रक असून सुरवंट व किडे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.

Web Title: African Chaatak birds arrive at Krishnakatha in Amanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.