सांगली जिल्ह्यात वकिलांचा बंद

By Admin | Updated: August 31, 2014 00:15 IST2014-08-31T00:13:38+5:302014-08-31T00:15:18+5:30

खंडपीठाची मागणी : संघटनेच्यावतीने निदर्शने

Advocates closed in Sangli district | सांगली जिल्ह्यात वकिलांचा बंद

सांगली जिल्ह्यात वकिलांचा बंद

सांगली : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी सांगली, मिरजेसह जिल्ह्यात वकिलांनी आज (शनिवार) पुकारलेले काम बंद आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनाचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. सांगलीत वकील संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापुरात खंडपीठ होण्याची वकिलांसह पक्षकारांची जुनी मागणी आहे. या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी महिनाभर वकिलांनी कामबंद आंदोलन केले होते. राज्य शासनानेही या आंदोलनाच पाठिंबा दिला होता. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींसोबत दोनवेळा बैठकही झाली होती. सकारात्मक तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र पुढे कोणत्याच हालचाली न झाल्याने वकिलांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला होता. कोल्हापुरातील एका वकिलांनी काम सुरु करण्याचा प्रयत्न केला; मात्र अन्य वकिलांनी तो हाणून पाडला.
वकिलांनी निदर्शनेही केली. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष महेश जाधव, सहाय्यक सरकारी वकील एस. एम. पखाली, दीपक शिंदे, अमोल पाटील, आर. बी. शेळके, एस. के. सनदी आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Advocates closed in Sangli district