बोरगाव आरोग्य केंद्रातील परिचारिकांना प्रशासनाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:13+5:302021-04-25T04:27:13+5:30
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील कोरोनाबाधित रुग्णाची तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन पातळीबाबत चुकीची माहिती देणाऱ्या त्या परिचारिकांना प्रशासनाने नोटीस ...

बोरगाव आरोग्य केंद्रातील परिचारिकांना प्रशासनाची नोटीस
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील कोरोनाबाधित रुग्णाची तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन पातळीबाबत चुकीची माहिती देणाऱ्या त्या परिचारिकांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या घटनेबाबत त्यांच्याकडून खुलासा घेण्याचे निर्देश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बोरगावमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. त्यातील काही रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या तपासणीसाठी परिचारिकांचे एक पथक कार्यरत आहे. गुरुवारी हे पथक एका महिला रुग्णाच्या तपासणीसाठी आले होते. रुग्णाची ऑक्सिजन पातळी त्यांनी दोनवेळा तपासली. मात्र तिथे असणाऱ्या रुग्णाच्या कुटुंबातील कुणालाही ऑक्सिमीटरवरील नोंद दाखवण्यात आली नाही. रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८५-८६ इतकी खालावली आहे. त्यांना तातडीने ऑक्सिजन बेड मिळवून उपचारासाठी दाखल करा, असे सांगून या परिचारिका निघून गेल्या. त्यामुळे रुग्णाचे कुटुंब काहीकाळ हतबल झाले होते.
मात्र सर्व तांत्रिक आणि वैद्यकीय शक्यता विचारात घेऊन नातेवाइकांनी न घाबरता या रुग्णाची दुसऱ्या दिवशी तपासणी केल्यावर ऑक्सिजन पातळी ९४ इतकी असल्याचे स्पष्ट झाले. परिचारिकांनी चुकीची माहिती दिल्याने याबाबतचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाले. याची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी या प्रकाराबाबत संबंधित परिचारिकाना नोटीस काढून त्यांचा खुलासा मागवून घ्या. तसेच चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.