सांगलीच्या सन्मती मंचचा व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा जागर--महावीर जयंती विशेष...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:14 IST2018-03-29T01:14:20+5:302018-03-29T01:14:20+5:30
सांगली : समाजात अनेक संघटना प्रबोधन, जनजागृतीचे काम करीत असतात. सन्मती संस्कार मंच ही जैन समाजातील अशीच एक संघटना. ही संघटना व्यसनमुक्ती, शाकाहार, स्वच्छता याचबरोबर धर्मसंस्काराचेही काम करते.

सांगलीच्या सन्मती मंचचा व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा जागर--महावीर जयंती विशेष...!
सांगली : समाजात अनेक संघटना प्रबोधन, जनजागृतीचे काम करीत असतात. सन्मती संस्कार मंच ही जैन समाजातील अशीच एक संघटना. ही संघटना व्यसनमुक्ती, शाकाहार, स्वच्छता याचबरोबर धर्मसंस्काराचेही काम करते. बारा वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आज वटवृक्ष बनले असून महाराष्ट्र, कर्नाटकातील हजारो लोक या मंचाशी जोडले गेले आहेत.
वीर सेवा दलाचे संस्थापक वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या सान्निध्यात राहिलेल्या व त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सुरेश चौगले यांनी २२ डिसेंबर २००५ रोजी सन्मती संस्कार मंचाची स्थापना केली. जैन समाजातील नव्या पिढीला धर्मसंस्काराचे धडे देण्याबरोबरच त्यांनी सामाजिक उपक्रमांचीही जोड दिली. संस्थापक सुरेश चौगले, अध्यक्ष विजय भोकरे यांनी सन्मती संस्कार मंचाची पताका महाराष्ट्र आणि कर्नाटकात फडकवली आहे.
वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी व्यसनमुक्ती व शाकाहारासाठी प्रचंड काम केले. त्यांच्या निधनानंतर ही चळवळ थोडी मागे पडली होती. चौगले यांनी तो विचार घेऊन संस्कार मंचाच्या कार्याला सुरूवात केली. कुंथलगिरी येथे पहिले धर्मसंस्कार शिबिर घेतले. तेथून सन्मती संस्कार मंचाने धर्मसंस्काराबरोबर सामाजिक उपक्रमाला वाहून घेतले.
डॉ. बाबा आमटेंचा आनंदवन, सांगलीतील एड्स सेवा केंद्र, विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी मंचाच्या कार्यकर्त्यांना नेऊन तेथे मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सांगलीच्या एड्स केंद्रात प्रत्येक दिवाळीला मंचातर्फे मुलांना साहित्याचे वाटप केले जाते. कोल्हापूरच्या नसिमा हुजरुक यांच्या अपंग सेवा केंद्रात आर्थिक मदतीबरोबरच अन्नदानासाठी मदत केली जाते. सोलापूर व पंढरपूरच्या अनाथाश्रमाला भेटी देऊन कार्यकर्त्यांचे वाढदिवस अशा आश्रमातून साजरे व्हावेत, असा संकल्प हाती घेतला आहे.
मंचाने गेल्या काही वर्षांपासून स्वच्छतेचा जागर सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या श्रवणबेळगोळ येथील महामस्तकाभिषेक सोहळ्यात दीड ते दोन हजार तरुण, वृद्ध, महिला यांनी सन्मती संस्कार मंचाच्या झेंड्याखाली स्वच्छतेची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. सम्मेद शिखरजी या जैनधर्मियांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही मंचाच्यावतीने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जाते.
समाजातील गोरगरिबांना सम्मेद शिखरजी, श्रवणबेळगोळ येथे मोफत दर्शन घडवले जाते. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात तर मंचने मोठे काम केले आहे. निमशिरगाव येथे आचार्य शांतिसागर महाराज जयंतीनिमित्त १००८ वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा ध्यासही त्यांनी घेतला आहे.
विधवांना दिला सन्मान
समाजात विधवा महिलांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यांना मानसन्मान मिळत नाही. अशा शंभरहून अधिक विधवा महिलांना एकत्र करून त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम मंचाने केले आहे. संस्कार मंचाच्यावतीने कोणताही कार्यक्रम असेल, तर त्यात विधवा महिलांना सहभागी करून घेतले जाते. त्यांच्याहस्ते ध्वजारोहण, दीपप्रज्ज्वलन करून त्यांचा सन्मान वाढविण्याचे काम केले जात आहे.
तीन बंधारे उभारणार
मंचतर्फे दरवर्षी कुंथलगिरी येथे धर्मसंस्कार शिबिर होत असते. तसा कुंथलगिरीचा परिसर हा दुष्काळीच. गतवर्षी येथे एक बंधारा बांधला. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची व्यवस्थाही झाली. यंदा आणखी तीन नवीन बंधारे बांधण्याचा संकल्प सुरेश चौगले व त्यांच्या मंचाने सोडला आहे.