गांजा, अफू या अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांचा व्यसनासाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:33+5:302021-09-02T04:57:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज शहरात आता अंमली चरस, गांजा, अफू या अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांचा व्यसनासाठी वापर ...

गांजा, अफू या अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांचा व्यसनासाठी वापर
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज शहरात आता अंमली चरस, गांजा, अफू या अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांचा व्यसनासाठी वापर सुरु झाला आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या या गोळ्यांची अवैध विक्री सुरु असून, अनेक तरुण या नशेच्या गोळ्यांचे सेवन करीत आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून गुन्हेगारी कृत्ये सुरु आहेत.
वैद्यकीय केंद्र, रेल्वे जंक्शन, तंतुवाद्य निर्मिती, संगीत व नाट्य पढरी म्हणून मिरज शहराची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षात मिरज शहरात चरस, गांजा, अफूच्या नशेसोबत मानसोपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांची नशा करण्यात येत आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या मिळत असल्याने या औषधांची राजरोस अवैध विक्री सुरू आहे. या औषधांची सवय लागलेले व्यसनी दहापट किमतीला या गोळ्या विकत घेत आहेत. अंमली पदार्थांप्रमाणे या नशेच्या गोळ्यांची सवय लागल्याने ही औषधे निरोगी व्यक्तीस घातक ठरत आहेत. मिरजेत रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर, शास्त्री चौक, खाॅजा वसाहतीसह शहरातील काही मुख्य चौक, झोपडपट्ट्या आदी ठिकाणी अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांची विक्री सुरु आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह १५ ते २५ वयोगटातील बेरोजगार तरूण अंमली पदार्थांसह नशेच्या गोळ्यांच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. नशेच्या आहारी गेलेले तरुण पैशांसाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत. यातूनच लूटमार, मारहाण व उपद्रव सुरु आहे. मिरजेत रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरासह शहरातही चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी व गुन्हेगारी कृत्ये वाढत आहेत. अंमली पदार्थांसोबत औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
चाैकट
मानसिक आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोव्हेट, पिगाबेट, रोझ या गोळ्यांचे नशेसाठी सर्रास सेवन सुरु आहे. ७० ते ८० रुपयांना मिळणारी या गोळ्यांची स्ट्रीप पाचशे रुपयांना विकली जात आहे. आवश्यकता नसताना नशेसाठी या गोळ्यांचे सेवन केल्यास मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.