आदर्श पलूस पंचायत समिती लाचखोरीमुळे झाली कलंकित

By Admin | Updated: April 28, 2015 00:20 IST2015-04-27T23:04:07+5:302015-04-28T00:20:24+5:30

आदर्शवादाची ‘ऐशीतैशी’ म्हणण्याची वेळ आली आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे सर्व कर्मचाऱ्यांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे.

The Adarsh ​​Palus Panchayat Samiti has been tarnished due to bribe | आदर्श पलूस पंचायत समिती लाचखोरीमुळे झाली कलंकित

आदर्श पलूस पंचायत समिती लाचखोरीमुळे झाली कलंकित

पलूस : ‘लाचलुचपत’च्या पथकाने रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा उभारणीसाठी, प्रकरण मंजुरीसाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना पलूस पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार चव्हाण आणि लिपिक वैजयंता पाटोळे यांना रंगेहात पकडल्याने, आदर्श म्हणून डंका वाजवणाऱ्या पलूस पंचायत समितीला एकप्रकारे कलंक लागला आहे.३४ गावांचा पलूस तालुका हा कृषी, औद्योगिक, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या आदर्श आणि प्रगत आहे. सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात देशात आणि राज्यात ओळख असणारा पलूस तालुका आहे. निर्मल तालुका, तंटामुक्त तालुका, डिजिटल तालुका, स्वच्छता अभियानात राज्यात उत्तम कामगिरी करणारा तालुका, इको व्हिलेज, शतकोटी वृक्ष लागवड, जलयुक्त शिवार अभियान अशा शासकीय योजनांमध्ये पलूस पंचायत समितीने अत्यंत चांगली कामे केली आहेत. परंतु लाचखोरी प्रकरणामुळे सर्व चांगल्या कामावर ‘विरजण’ पडले आहे. राज्यात आदर्श पंचायत समिती हे नाव आता कलंकित झाले आहे. याबाबत पंचायत समिती आदर्श करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व विभागात जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील जनता करू लागली आहे.
पलूस तालुक्यातील भ्रष्टाचाराची ही कीड अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने वेळीच दूर केली आहे. इथून पुढे भ्रष्टाचाराच्या रोगाला आळा बसेल, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)


आदर्शवादाची ऐशीतैशी --शेतकरी अगोदरच अस्मानी संकटात सापडला असताना, शासकीय योजनांचा निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी लाच घेतली जाते, हे उघड झाल्याने पलूस पंचायत समितीतील सर्व विभागात चाललेल्या कामांबाबत शंका निर्माण झाली आहे. आदर्शवादाची ‘ऐशीतैशी’ म्हणण्याची वेळ आली आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे सर्व कर्मचाऱ्यांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे.

Web Title: The Adarsh ​​Palus Panchayat Samiti has been tarnished due to bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.