खंडेराजुरीच्या ग्रामसेवकाचे कारनामे पुन्हा चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 00:33 IST2015-09-30T22:53:24+5:302015-10-01T00:33:18+5:30
पाच लाखांचा घोटाळा : कारवाईचा प्रश्न

खंडेराजुरीच्या ग्रामसेवकाचे कारनामे पुन्हा चव्हाट्यावर
मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीमध्ये २०१२-१३ या वर्षात शासकीय योजनांसह करवसुलीत अंदाजे पाच लाखाहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या कारभाराला जबाबदार असलेला ग्रामसेवक एस. एस. कुवर फरारी असल्याने कारवाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामसेवक एस. एस. कुवर याची कारकीर्द तासगाव तालुक्याबरोबरच मिरज तालुक्यातही वादग्रस्त ठरली आहे. खंडेराजुरी ग्रामपंचायतीतील २०१२-१३ या वर्षातील कुवर याच्या कारभाराच्या लेखापरीक्षणात पाच लाखांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट होत आहे. कागदपत्रे उपलब्ध नसल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. कुवर याने घरपट्टी कर वसुली केली आहे. ग्रामस्थांना पावत्याही दिल्या आहेत. मात्र कर वसुलीची सुमारे १ लाख ५५ हजारहून अधिक रक्कम बँकेच्या खात्यावर जमा नाही. तसेच २८ हजार रूपये खर्चाच्या रकमेचाही हिशेब नाही. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर असलेल्या १२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित दोन हप्ते मिळाले नाहीत. ग्रामपंचायतीच्या खात्यावर मात्र हा निधी शिल्लक नाही. यामुळे २ लाख रुपयांवर त्याने डल्ला मारल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी बाराव्या वित्त आयोगाचा निधी देण्यात येतो. या योजनेच्या खर्चाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने निधीत ८० हजार रुपयांचा घोटाळा असल्याची शंका आहे.
ग्रामसेवक कुवर (मूळ गाव कळंबू, जि. धुळे) फरारी आहे. कुवरवर कारवाईची मागणी होत असली तरी, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे खंडेराजुरी ग्रामपंचायतीतील गैरकारभारप्रकरणी कारवाई रखडली आहे. (वार्ताहर)
तीन वर्षापासून फरार
तासगाव तालुक्यात कार्यरत असताना कामातील अनियमितता, दप्तर न देणे, गैरवर्तन असे त्याच्यावर आरोप आहेत. खंडेराजुरी ग्रामपंचायतीमध्येही त्याने अशाच पध्दतीने बेधुंद कारभार केला. या गैरकारभाराची दखल घेऊन जि. प. प्रशासनाने कुवरवर २०१२ मध्ये निलंबनाची कारवाई करून आटपाडी पंचायत समितीकडे हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण आटपाडी येथे हजर न राहता, तो गेल्या तीन वर्षापासून फरारी आहे.