शहरातील दोन हाॅटेल, बेकरीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:32+5:302021-03-31T04:26:32+5:30
ओळी : शहरातील हाॅटेलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मंगळवारी दंडात्मक ...

शहरातील दोन हाॅटेल, बेकरीवर कारवाई
ओळी : शहरातील हाॅटेलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी आस्थापना, हॉटेलवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोरोना त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्या दोन हाॅटेल व एका बेकरीवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आयुक्त नितीन कापडणीस यांनी खासगी आस्थापना, हॉटेलच्या तपासणीचे आदेश दिले होते. यानुसार मंगळवारी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने रस्त्यावर उतरत छापासत्र सुरू केले आहे. सांगलीतील अनेक मोठी हॉटेल, नाष्टा सेंटर यांची तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंग, ग्राहक, कर्मचारी मास्क घातला आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. अनेक हॉटेलमध्ये कर्मचारी विनामास्क आढळून आले तर सोशल डिटन्सचे उल्लंघन करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली.
उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, अतिक्रमण अधिकारी तथा सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, वैभव कुदळे आदींंच्या पथकाने हॉटेल नटराजला १० हजार, हॉटेल सीप अँड स्नॅक्सला सोशल डिस्टन्स उल्लंघन आणि नियमबाह्य प्लास्टिकसाठी ४५ हजार तर सफा बेकरीवर सोशल डिस्टन्सिंगचा भंग केल्याबद्दल २० हजार असा एकूण ७५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
चौकट
कोट
खासगी आस्थापना, हॉटेल तसेच मोठ्या आस्थापनांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे अन्यथा महापालिकेच्या पथकाकडून छापा टाकून तपासणी केली जाईल. प्रसंगी या आस्थापना सील करण्याबरोबर दंडात्मक कारवाईही करण्यात येईल.
- राहुल रोकडे, उपायुक्त, महापालिका