सांगलीत कारवाई : वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
By Admin | Updated: September 11, 2014 00:37 IST2014-09-11T00:37:08+5:302014-09-11T00:37:40+5:30
‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यात

सांगलीत कारवाई : वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
सांगलीत कारवाई : वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यात
सांगली : सावकारीचा परवाना देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना मिरज येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील लिपिक सुरेश बबनराव चव्हाण (वय २७, रा. गल्ली क्र. १, विजयनगर, सांगली) याला आज (बुधवार) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई येथील राम मंदिर चौकात करण्यात आली.
सुरेश चव्हाण मिरज येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात लिपिक आहे. संबंधित तक्रारदारास सावकारीचा परवाना हवा होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्याचे उपनिबंधक कार्यालयाकडे हेलपाटे सुरू होते. मात्र सुरेश चव्हाण याने सावकारीचा परवाना देण्यासाठी २५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज सकाळी तक्रार केली. त्यानंतर तक्रारदाराने चव्हाण याला दूरध्वनी करून, २५ हजारामधील काही रक्कम कमी करण्याची विनंती केली. तडतोडीनंतर २० हजार रुपयांत व्यवहार ठरला. पैसे देण्यासाठी मिरज येथील कार्यालयात येतो, असे तक्रारदाराने सांगितल्यानंतर, ‘दुपारी दोन वाजता आपण सांगलीत येणार असून तेथेच पैसे द्यावेत’, असे चव्हाण याने सांगितले. त्यांचे हे बोलणे मोबाईलवर रेकॉर्ड (ध्वनिमुद्रित) करण्यात आले.चव्हाण दुपारी सव्वादोनला एका बँकेच्या बैठकीला हजर राहण्यासाठी सांगलीतील राममंदिर चौकात आला व तेथूनच त्याने तक्रारदारास दूरध्वनी करून बोलावून घेतले. यावेळी राममंदिर चौकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. तक्रारदाराकडून वीस हजारांची लाच स्वीकारताना चव्हाण याला रंगेहात पकडण्यात आले.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उद्या (गुरुवार) चव्हाण याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
सामान्यांची राजरोस लूट
सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात सामान्यांची राजरोस लूट सुरू असते. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याचा उपयोग झालेला नाही. वरिष्ठांकडूनही याची दखल घेतली गेलेली नाही. आतातरी या कार्यालयातील कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.