वाहन परवान्याच्या ऑनलाईन यंत्रणेचा गैरवापर केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:14+5:302021-06-23T04:18:14+5:30
सांगी : आरटीओ विभागाने शिकाऊ वाहन परवान्यासाठी ऑनलाईन प्रणाली १४ जूनपासून कार्यान्वित केली आहे. तिचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई ...

वाहन परवान्याच्या ऑनलाईन यंत्रणेचा गैरवापर केल्यास कारवाई
सांगी : आरटीओ विभागाने शिकाऊ वाहन परवान्यासाठी ऑनलाईन प्रणाली १४ जूनपासून कार्यान्वित केली आहे. तिचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिला आहे.
वाहन चालवण्यासाठी शिकाऊ परवाना आजवर आरटीओ कार्यालयात मिळायचा. नव्या नियमानुसार आता कार्यालयात जावे लागणार नाही. ऑनलाईन स्वरुपात अर्ज करता येणार आहे. या प्रणालीमध्ये कोणीही छेडछाड करू नये, यासाठी आवश्यक त्या सुधारणा टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत. यादरम्यान कोणीही तिचा गैरवापर करू नये, यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. गैरवापर करणाऱ्या अर्जदार, एजंट, अनधिकृत व्यक्तींवर आवश्यक ती पोलीस कारवाई करणार असल्याचे कांबळे म्हणाले. संबंधित व्यक्तिचा वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, असेही ते म्हणाले.
ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणारी महा ई-सेवा केंद्रे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल व इंटरनेट कॅफे अशा संस्थांविरूध्द पोलीस कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे. गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी स्थानिक प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन कांबळे यांनी केले.
या प्रणालीमध्ये आधारकार्ड क्रमांक व त्यावरील माहिती, छायाचित्र आदी बाबी सारथी प्रणालीवर चुकीच्या पध्दतीने दिसत असल्यास त्यांची सुधारणा केली जाणार आहे.