निधी खर्च न झाल्यास ग्रामसेवकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:47+5:302021-01-21T04:24:47+5:30
जत : जत तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांची पगारवाढ रोखणार; तसेच त्यांच्या मासिक ...

निधी खर्च न झाल्यास ग्रामसेवकांवर कारवाई
जत : जत तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांची पगारवाढ रोखणार; तसेच त्यांच्या मासिक पगारातून रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी जत येथे बोलताना दिला.
जत पंचायत समिती सभागृहात जत तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सुरू असलेल्या व अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सुनीता पवार, विस्तार अधिकारी मनोज जाधव, एस. एस. सौदागर, पी. एस. चव्हाण उपस्थित होते.
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जत तालुक्यात सुरू असलेली कामे ३१ मार्च २०२१ अखेर पूर्ण करावीत; जर वेळेत हा निधी खर्च झाला नाही व ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे निधी शासनाकडे परत गेला म्हणून ग्रामसेवकांच्या मासिक पगारातून वसुली करून घरकुलाचे काम पूर्ण करुन घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी इमारत आदी नादुरुस्त इमारतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारी रक्कम त्यांना देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत, असेही चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.
चाैकट
जबाबदारीचे भान ठेवा
निधी आणणे व विकास काम पूर्ण करून घेणे यासाठी शासन प्राधान्यक्रम देत आहे. त्यानुसार ग्रामसेवकांनी जबाबदारीचे भान ठेवून वेळेत काम पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. जे ग्रामसेवक शासकीय नियमांचे पालन न करता बेजबाबदारपणे वागतील त्यांच्यावर ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असेही चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.