कोरोना संशयितांची माहिती न देणाऱ्या डॉक्टरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:53+5:302021-07-17T04:21:53+5:30
ओळी :- शहरातील खासगी दवाखान्यांची शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट देऊन तपासणी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्याधिकारी ...

कोरोना संशयितांची माहिती न देणाऱ्या डॉक्टरवर कारवाई
ओळी :- शहरातील खासगी दवाखान्यांची शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट देऊन तपासणी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील खासगी दवाखान्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. दवाखान्यात उपचार घेणाऱ्या कोरोना संशयितांची माहिती महापालिकेला न देणाऱ्या डाॅक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी शुक्रवारी दिला.
आयुक्त कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांनी शहरातील दवाखान्याला भेट देऊन तपासणी केली. दोन दिवसांपूर्वी राज्य टास्क फोर्सचे संचालक डाॅ. सुभाष साळुंखे यांनी कोरोना संसर्गाचा आढावा घेतला होता. सारी, आयएलएमच्या रुग्णांची माहिती खासगी दवाखान्यातून घेण्याची सूचनाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी चालविली आहे.
कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील अनेक जनरल प्रॅक्टिशनर कोरोना आजाराची लक्षणे असणाऱ्या संशयितांची माहिती देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. या सुपर स्प्रेडर रुग्णांवर वेळीच उपचार करण्याची गरज आहे. त्यासाठी दवाखान्यांची तपासणी सत्र सुरू केले आहे. दवाखान्यात ताप, सर्दी व इतर कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती महापालिकेला कळविणे बंधनकारक आहे. त्यात हयगय करणाऱ्या डाॅक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.