जिल्ह्यातील साडेसातशे व्यापाऱ्यांवर कारवाई

By Admin | Updated: April 4, 2015 00:05 IST2015-04-03T23:20:35+5:302015-04-04T00:05:50+5:30

ग्राहकांची फसवणूक : २७ लाखांचा दंड वसूल; शेतकऱ्यांकडून माल विकत घेतानाही काटामारी

Action on 460 businessmen in the district | जिल्ह्यातील साडेसातशे व्यापाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यातील साडेसातशे व्यापाऱ्यांवर कारवाई

सचिन लाड - सांगली --ग्राहकांची फसवणूक करून व्यवसाय करणाऱ्या जिल्ह्यातील ७४७ व्यापाऱ्यांवर वैधमापन शास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. यामध्ये लहान व मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करून त्यांच्याकडून सुमारे २७ लाख १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत शेतकऱ्यांकडून माल विकत घेताना ‘काटा’ मारणारे व्यापारीही सापडले आहेत. सहायक नियंत्रक पांडुरंग बिरादार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मूळ किमतीपेक्षा जादा दराने मालाची विक्री करणे, मालाच्या पॅकिंगवरील मूळ किंमत खोडून त्यावर जादा किंमत टाकणे, कंपनीचे लेबल नसलेल्या मालाची विक्री करणे, माल देताना कमी देऊन मापात पाप करणे, शेतकऱ्याचा माल खरेदी करताना काटा मारणे, माल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना त्याचे बिल देण्यास टाळाटाळ करणे, साधा माल खरेदी करुन त्यावर मोठ्या कंपनीच्या नावाचे लेबल लावून विक्री करणे, अशा स्वरूपाची व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ग्राहक प्रत्यक्षात तक्रारी करत नसल्याने वैधमापन शास्त्र विभागास कारवाई कुठे आणि कुणावर करायची? असा प्रश्न पडतो. यासाठी ते कारवाईसाठी स्वतंत्र पथके नेमतात. अचानक दुकानात बोगस ग्राहक म्हणून जातात. शेतकऱ्यांचा माल खरेदीवेळीही ते उपस्थित राहतात. गौडबंगाल दिसून आल्यास ते जागेवरच कारवाई करतात. सर्वाधिक सांगली, मिरजेतील साडेतीनशेहून अधिक व्यापाऱ्यांवर कारवाई झाली आहे.


व्यापाऱ्यांवर कारवाई करुन महसूल उद्दिष्ट पूर्ण करणे, हा उद्देश नाही. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना मूळ किमतीपेक्षा जादा दराने माल मिळू नये, मापात माप होऊ नये, यासाठी सातत्याने कारवाई केली जाते. लोकांनीही तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
- पांडुरंग बिरादार, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग, सांगली.


उद्दिष्टापेक्षा ४९ लाख जादा
शासनाने २०१४-१५ या वर्षासाठी सांगलीच्या वैधमापन शास्त्र विभागास ७७ लाखांचे महसूल उद्दिष्ट दिले होते. मात्र या विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने उद्दिष्ट पूर्ण होऊन ४९ लाख रुपये जादा महसूल गोळा केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढतच आहे. यासाठी आता दंडात्मक कारवाईबरोबरच व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

Web Title: Action on 460 businessmen in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.