ठाणापुडेत नवाेदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST2021-07-28T04:28:06+5:302021-07-28T04:28:06+5:30
फाेटाे : २७ सागर बागडी लाेकमत न्युज नेटवर्क ऐतवडे बुद्रुक : ठाणापुडे (ता. वाळवा) येथील नवदांपत्याची दुचाकी घसरून ...

ठाणापुडेत नवाेदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू
फाेटाे : २७ सागर बागडी
लाेकमत न्युज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : ठाणापुडे (ता. वाळवा) येथील नवदांपत्याची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात रस्ताच्या कडेला असणाऱ्या दगडाला धडकून नवाेदित अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. पायल सागर बागडी (वय २६) असे मृत अभिनेत्रीचे नाव आहे, तर तिचा पती दिग्दर्शक सागर राजाराम बागडी (वय ३४) हा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. तीन आठवड्यांपूर्वी उभयतांचा विवाह झाला हाेता.
ठाणापुडे येथील सागर बागडी व इचलकरंजी येथील पायल शहा याचा ५ जुलै रोजी विवाह झाला होता. साेमवार, दि. २६ राेजी दाेघे करंजवडे येथील मित्राबरोबर वशी येथील घनवट मळ्यात जेवायला गेले होते. रात्री उशीर झाल्याने तेथेच थांबून मंगळवारी पहाटे दुचाकीवरून (क्र. एमएच १०- ५१६९) निघाले. करंजवडे-डोंगरवाडी रस्त्यावर पळूस ओढ्यावर दुचाकी घसरली. सागरचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दगडावर जाऊन धडकली. पाठीमागे बसलेल्या पायलचे डोके दगडावर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. तर सागर याचा एक पाय व एक हात माेडला. त्याच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नाेंद कुरळप पोलिसांत झाली आहे. अधिक तपास हवालदार राजेंद्र जाधव करीत आहेत.
चौकट
पायल व सागर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित हाेते. यामुळे त्यांची मागील दोन-तीन वर्षांपासून ओळख होती. सागर याने दिग्दर्शित केलेल्या 'सैर' या मराठी चित्रपटात पायलने मुख्य अभिनेत्रीचे काम केले हाेते. दरम्यान त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर त्यांनी नाेंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र ते सागरच्या कुटुंबीयांना मान्य नसल्याने त्यांनी ५ जुलै रोजी दाेघांचे विधिवत लग्न लावून दिले. पायलच्या बहिणीचे चार दिवसांनी लग्न आहे. यामुळे मंगळवारी सकाळी तिचे वडील इचलकरंजीवरून तिला नेण्यासाठी येणार हाेते. यामुळे पायलने मंगळवारी पहाटेच ३.३० वाजता बहीण गुंजलला ‘आवरून बसतो, लवकर या’ असा मेसेज केला होता. मात्र ठाणापुडे येथे येण्यापूर्वीच तिचा अपघाती मृत्यू झाला.