गार्डीजवळ अपघात; दोन ठार

By Admin | Updated: June 9, 2014 00:57 IST2014-06-09T00:54:09+5:302014-06-09T00:57:29+5:30

व्हॅनची ट्रकला धडक : मृत जेजुरीचे; मध्यरात्रीची घटना

Accident near the Gardi; Two killed | गार्डीजवळ अपघात; दोन ठार

गार्डीजवळ अपघात; दोन ठार

विटा (जि. सांगली) : सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता. खानापूर)जवळ ट्रेलर ट्रक व व्हॅन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील दोघेजण ठार झाले. ही घटना काल, शनिवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश बाळासाहेब दरेकर (वय ३३) व प्रवीण सदाशिव पवार (४०, दोघेही रा. चिंचेच्या बागेजवळ, जेजुरी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. यातील प्रवीण हे जागीच ठार झाले, तर योगेश यांचा कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी (ता. पुरंदर) येथील योगेश दरेकर यांची विटा ही सासुरवाडी आहे. त्यांची पत्नी प्रसूतीसाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विटा येथे माहेरी आली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वीच योगेशला कन्या झाली. त्यामुळे शनिवारी सकाळी योगेश कन्येला पाहण्यासाठी प्रवीण पवारसह विट्यात आले होते. शनिवारी रात्री जेवण आटोपून हे दोघेजण त्यांच्या व्हॅनने (एमएच १२, एम-८४८१) विट्यातून मायणीमार्गे जेजुरीकडे चालले होते. त्यावेळी व्हॅनच्या पुढे विट्याहून गार्डीकडे जाणाऱ्या ट्रेलर ट्रकने (एमएच १८, एम-८८४३) खानापूर तालुक्यातील गार्डी गावातून डाव्या बाजूला नेवरी रस्त्याकडे अचानक वळण घेतले. ट्रकची लांबी जास्त असल्याने ट्रकचालकाने प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळण घेऊन ट्रक आडवा मारला. त्यावेळी व्हॅनचालकाचा अंदाज चुकल्याने व्हॅन ट्रकच्या पुढील बाजूस जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, व्हॅनचालकाच्या बाजूला बसलेले प्रवीण सदाशिव पवार जागीच ठार झाले, तर चालक योगेश दरेकर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच योगेश यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
गंभीर जखमी योगेश यांना त्यांचे मेहुणे धनंजय कदम यांनी प्रथम विट्यात व नंतर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच योगेश यांचा मृत्यू झाला. आज, रविवारी सकाळी विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांवर रविवारी दुपारी जेजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, चार बहिणी; तर प्रवीण यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद विटा पोलिसांत झाली असून अधिक तपास हवालदार महादेव खोत करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Accident near the Gardi; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.