रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारा
By Admin | Updated: November 12, 2014 23:20 IST2014-11-12T22:26:03+5:302014-11-12T23:20:23+5:30
जे. के. जाधव : मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारा
दुधोंडी : रंगराजन समितीच्या साखर उद्योगाबाबतच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकाराव्यात, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव व शिष्टमंडळाने दिले. यावेळी फडणवीस यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, साखर उद्योग निर्बंधमुक्त करण्याबाबतच्या शिफारशी रंगराजन समितीने केंद्र सरकारकडे सादर केल्या आहेत. या शिफारशी शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या व शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आहेत. परंतु काही शिफारशी जशाच्या तशा स्वीकारलेल्या नाहीत. यामध्ये दोन्ही कारखान्यांमधील अंतर ठराविक असले पाहिजे, असे बंधन शासनाने घातले आहे; मात्र असे कोणतेही बंधन रंगराजन समितीमध्ये नाही. उलट रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्यातील अंतराची अट नसल्यास जवळ-जवळ कारखाने उभे राहून कारखान्यामध्ये ऊस उचलण्यासंदर्भात चढाओढ निर्माण होईल व दर देण्याबाबत स्पर्धा निर्माण होईल, असा उद्देश रंगराजन समितीचा होता.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली येथे भेटून जे. के. बापू जाधव व शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, साखर उद्योगावर आलेले संकट दूर करण्यासाठी साखर उत्पादनावर होणारा खर्च व विक्री यामध्ये असलेली तफावत दूर करून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या उसाला जास्तीत-जास्त भाव मिळावा, यासाठी सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकाराव्यात व तसा आदेश राज्य शासनास द्यावा. त्यावेळी पंतप्रधानांनी याचा सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री प्रकाश मेहता, मंत्री विनोद तावडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)