ऑनलाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:24+5:302021-05-13T04:26:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : राज्यात १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. ...

ऑनलाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी गैरहजर
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : राज्यात १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. मात्र जिल्ह्याबाहेरील काही लोक ऑनलाईन नोंदणी करूनही लसीकरणासाठी उपस्थित राहत नाहीत. या लोकांना ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर फोन करून बोलावून घेत आहेत. तरीही फोन न उचलणे, उलटसुलट बोलणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे आपत्तीच्या काळातही खोडसाळपणा करणाऱ्या या नागरिकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी कडेगाव तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.
वास्तविक ऑनलाईन नोंदणीसाठी अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची डोकेदुखी होत आहे. दररोज रात्री आठनंतर लसीकरणासाठी दिलेल्या लिंकवरून पुढील दिवसाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र काही सेकंदांत संबंधित रुग्णालयांमध्ये उपलब्ध लसीच्या संख्येइतक्या लोकांची नोंद होते. यामुळे मोबाईल रेंजअभावी तसेच सर्व तांत्रिक बाबींची माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश लोकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही.
या काळात रुग्णालयापासून दूरवरच्या अंतरावरील कित्येक लोक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतात. सर्वांनाच लस घेण्याचा आणि आपल्याला हवे त्या रुग्णालयाची निवड करण्याचा आणि अगदी वेळेची निवड करण्याचाही हक्क आहे. मात्र नोंदणी केलीच आहे तर संबंधित लोकांनी लसीकरणासाठी
उपस्थित राहण्याची गरज आहे. संबंधित लोकांच्या खोडसाळपणामुळे व विकृत वर्तनामुळे रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील गरजू लोकांना लस मिळत नाही. यावर राज्यस्तरावर ठोस निर्णय घेऊन संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत.
चौकट
त्या लसींचा साठा रुग्णालयात शिल्लक
लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी गैरहजर राहत असलेल्या लोकांची संख्या सरासरी १० टक्के आहे. असे रुग्णालयांमध्ये माहिती घेतली असता समजले. संबंधित लोकांसाठी उपलब्ध असलेल्या लसींचा साठा रुग्णालयांमध्ये शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या लसींची नोंद ठेवून ऑफलाईन पद्धतीने देण्याची परवानगी संबंधित रुग्णालयांना द्यावी, अशी अपेक्षा स्थानिक गरजू नागरिक व्यक्त करीत आहेत.