आबा अनंतात विलीन

By Admin | Updated: February 18, 2015 01:22 IST2015-02-18T01:22:54+5:302015-02-18T01:22:54+5:30

अंजनीत अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

Aba Ananta merged | आबा अनंतात विलीन

आबा अनंतात विलीन

 सांगली : लाखोंच्या संख्येने लोटलेला जनसागर, अश्रूंचा फुटलेला बांध आणि ‘अमर रहे, अमर रहे... आर. आर. आबा अमर रहे’ अशा घोषणांनी भावनिक झालेल्या वातावरणात मंगळवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या जन्मगावी अंजनी (ता. तासगाव) येथे दुपारी दोनच्या दरम्यान शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, समर्थक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लाखोंचा शोकाकुल जनसागर लोटला होता.
सोमवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आर. आर. पाटील यांचे निधन झाले. सकाळी पावणेआठ वाजता रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव तासगावात आणण्यात आले. फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून निमणी रस्त्यावरून सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा सुरू झाली. तासगावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. तासाभरात शहरातील सर्व रस्ते गर्दीने भरून गेले. त्यानंतर अंजनी येथे पाटील यांच्या घरी पार्थिव नेण्यात आले. पार्थिव घरी दाखल होताच कुटुंबीयांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गावासह परिसरावर शोककळा पसरली होती. धाय मोकलून रडणाऱ्या व धक्क्यातून न सावरलेल्या कार्यकर्त्यांनी अंजनी येथील निवासस्थानी सकाळपासून गर्दी केली होती.
अंजनीजवळ तासगाव-वडगाव रस्त्यावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी पावणेदोन वाजता पोलीस पथकाने आर. आर. पाटील यांना अखेरची सलामी दिली. रायफलींमधून तीनवेळा एकवीस फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. आर. आर. यांचा मुलगा रोहित, कन्या स्मिता आणि प्रियांका यांनी दुपारी दोन वाजता भडाग्नी दिला. लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ‘अमर रहे अमर रहे, आर. आर. आबा अमर रहे’ अशा घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, वाहतूक व दळणवळणमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी भावंडांना सावरले
खा. सुप्रिया सुळे जेव्हा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्या, तेव्हा अनेक महिला त्यांच्या गळ्यात पडल्या. त्यांना सावरतच त्या चौथऱ्याकडे गेल्या. आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन, मुली स्मिता आणि प्रियांका, मुलगा रोहित यांना शोक अनावर झाला होता. अंत्यसंस्कारावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी या तीन भावंडांसह सुमन यांना सावरले. त्यांना पोटाशी धरून धीर देण्याचा प्रयत्न त्या करीत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Aba Ananta merged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.