जिल्ह्यातील ५० हजार निराधारांना ‘आधार’; प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:38+5:302021-04-20T04:27:38+5:30
सांगली : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने निराधारांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या ...

जिल्ह्यातील ५० हजार निराधारांना ‘आधार’; प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत!
सांगली : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने निराधारांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार जिल्ह्यातील ५० हजार १९ निराधारांना एक हजार रुपयांचा आधार मिळणार आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी निर्बंध कडक करण्यात आले होते. मात्र, कोेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली. मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक, निराधार, आदींना थोडाफार दिलासा म्हणून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना, आदी योजनेंतर्गत असलेल्या निराधार लाभार्थींसाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली. याचा लाभ जिल्ह्यातील ५० हजार १९ लाभार्थींना होणार आहे. या मदतीमुळे वृद्ध, निराधारांना मोठा फायदा होणार आहे.
कोट -
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कडक केले आहेत. या दरम्यान निराधारांची परवड होईल. शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा करून थोडाफार दिलासा आहे.
- आशा जाधव
कोट -
संचारबंदीमुळे निराधार नागरिकांची गैरसोय होणार आहे. शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने यामधून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल. एक हजार रुपये केव्हा मिळतात, हे अद्याप निश्चित नाही.
- कमलाबाई वाघमारे
कोट -
कोरोनामुळे सर्वांचेच जगणं कठीण झाले आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रोजगारही नाही. त्यामुळे शासनाने निराधारांना किमान दोन हजार रुपये देणे अपेक्षित होते.
- नंदा वाघ
कोट
कोरोना विषाणू संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा करून निराधार लाभार्थींना थोडाफार दिला आहे.
- गयाबाई शिंदे
कोट -
एक हजार रुपये देण्याची घोषणा करून शासनाने निराधारांना आधार देण्याचा प्रयत्न केला. निराधारांचे मानधन दरमहा एक तारखेला मिळेल, अशीही व्यवस्था करावी.
- आशाबाई पवार
चौकट
- संजय गांधी निराधार योजना : ३२७५९
-श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना : ११३५१
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना : ५०३६
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना : ७३९
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना : १३४