आबा गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’
By Admin | Updated: July 10, 2016 01:40 IST2016-07-10T00:43:06+5:302016-07-10T01:40:41+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष निवड : तासगावात चर्चा ‘जयंत जनता पार्टीची’

आबा गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’
दत्ता पाटील-- तासगाव --जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या स्नेहल पाटील यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या गोटातच उकळ्या फुटल्या. आबांच्या पश्चात राष्ट्रवादीपासून फारकत, मात्र आमदार जयंत पाटील यांच्याशी संधान असलेल्या आबा निष्ठावंतांतही उत्साह संचारला. यातील बरीचशी मंडळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशीही संधान साधून आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडीतून आबा गटाचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची खेळी करण्यात आल्याची चर्चा असून, या निमित्ताने तासगावात आबांच्या पश्चात ‘जयंत जनता पार्टी’ची मुळे रोवली गेल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत यावेळी पहिल्यांदाच अनेक नवीन समीकरणे उदयास आली. यापूर्वी नेत्यांच्या निर्णयानुसार होणारी अध्यक्ष निवड पहिल्यांदाच सदस्यांची कलचाचणी घेऊन झाली. आर. आर. पाटील, जयंत पाटील यांच्यातील चर्चेनंतर अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब व्हायचे. एखाद्या तालुक्यास अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाल्यास, त्या तालुक्यातील नेत्यांनाच अध्यक्षपदाचे नाव सुचविण्याचा अधिकार दिला जायचा. मात्र यावेळी पहिल्यांदाच जुने संकेत बासनात गुंडाळण्यात आले. नवे धोरण ठरवण्यात आले. त्यानुसार स्नेहल पाटील यांची निवड झाली. मात्र ही निवड राष्ट्रवादीच्या पथ्यावर कितपत पडणार, याची चर्चा होत आहे. या निवडीने तालुक्यातील आबा गटाचे अस्तित्व मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनीच सापळा रचला असल्याचे बोलले जात आहे.
आर. आर. पाटील आबांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील यांनी नेतृत्वाची सूत्रे स्वीकारली. राजकारणात नवख्या असतानादेखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची कार्यपध्दती रुचली नसल्याने काही कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली, तर काहींनी अलिप्त राहत जयंत पाटील यांच्याशी संपर्क ठेवला. दुसरीकडे आबा गटातील काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँक निवडणुकीपासून जयंत पाटील यांचे पालकत्व मान्य नसल्याचे सांगत, त्यांचा रोष पत्करला.
अध्यक्ष निवडीनंतर आबा कुटुबियांसोबत असणाऱ्या गटात उत्साह जाणवला नाही. मात्र एक पाय चिंंचणीत आणि दुसरा पाय इस्लामपुरात असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्याचे शल्य आबा गटाला बोचत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
एकंदरीत आबा गटाचे अस्तित्व संपवण्यासाठीच अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणात ‘जयंत जनता पार्टी’ने बाळसे धरल्याची चर्चा आहे.
पतंगरावांवर प्रेम; जयंतरावांवर रोष
अध्यक्ष निवडीत आमदार सुमनताई पाटील यांना काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांनी उमेदवार देणार नसल्याचा शब्द दिला होता. त्यांनी तो शब्द पाळलाही. मात्र सुमनतार्इंनी सुचविलेल्या योजना शिंदे यांच्याऐवजी स्रेहल पाटील यांची निवड झाल्याने तालुक्यातील कार्यकर्र्र्त्यांत नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात येळावी वगळता कोठेच अध्यक्षपदाचा जल्लोष दिसून येत नाही. आबांच्या पश्चात पतंगरावांनी आबा गटावर प्रेम कायम ठेवल्याची भावना व्यक्त होत आहे, तर तालुक्याचे पालकत्व असूनही जयंतरावांनी तालुक्याच्या हिताचा निर्णय घेतला नसल्याने त्यांच्याबाबत रोष व्यक्त होत आहे.
जयंत पाटलांची एन्ट्री
स्नेहल पाटील कुटुंबीयांची आबा घराण्याशी जुनी निष्ठा आहे. मात्र अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जयंत पाटील यांच्याशी सूर जुळल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे आबांच्या पश्चात राष्ट्रवादीतील काही जुन्या निष्ठावंतांनी आबांच्या कुटुंबियांविरोधात रोष व्यक्त करुन राष्ट्रवादीपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यापैकी काहींनी भाजपशी सलगी केली, तर काहींनी इस्लामपूरशी नाळ जोडली होती. अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने आबांच्या पश्चात तासगाव तालुक्यात जयंत पाटील यांचा स्वतंत्र गट निर्माण होत आहे. या गटातील काहींचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशीही सलोख्याचे संबंध आहेत.