कुरळप : वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका युवा कंत्राटदाराने आपले जीवन संपवल्याची घटना घडली. हर्षल अशोक पाटील (वय ३९, रा. तांदूळवाडी, ता. वाळवा) असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने या घटनेबाबत दु:ख व्यक्त करीत थकीत बिलापोटी हर्षल यांनी आत्महत्या केल्याचे पत्रकात म्हटले आहे.तांदूळवाडीतील मानसिंग भगवान पाटील व युवराज शंकर पाटील यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला मंगळवारी सायंकाळी ६ ते बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान दोरीने गळफास घेऊन हर्षल यांनी आत्महत्या केली. याबाबत सचिन पाटील यांनी कुरळप पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले देण्यासाठी शासनाकडे जवळपास १ वर्षापासून निधीच उपलब्ध नाही. तसेच, केंद्रानेही निधी देऊ शकत नाही, असे पत्र राज्य शासनास धाडले. याचाच गंभीर आर्थिक परिणाम तरुण उद्योजक व जलजीवन मिशनचे कंत्राटदार हर्षल पाटील याच्यावर झाला. त्यांनी २२ जुलै रोजी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे शासनाकडे जवळपास १ कोटी ४० लाखांची देयके प्रलंबित होती. सावकार व इतरांकडून घेतलेले जवळपास ६५ लाखांचे कर्ज होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो त्यांच्या मित्रांना मी आत्महत्या करतो, हे शासन पैसे देत नाही. इतर लोक मला पैशांसाठी तगादा लावत आहेत. वडिलांना काय सांगू नका, असे बोलत होता. त्यांच्या परिवारास शासनाने तातडीने आर्थिक मदत व त्यांचे प्रलंबित देयके देऊन कंत्राटदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्यांच्या पत्नीच्या नावे वर्ग करावेत. शासनाने कंत्राटदारांची सर्व विभागाकडील देयके तातडीने देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा असे नवयुवक, उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
सांगलीतील तांदूळवाडीमधील ‘जलजीवन’च्या युवा कंत्राटदाराने संपविले जीवन, कंत्राटदार महासंघाकडून शासनाविषयी संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:36 IST