सांगली : बेदाणा प्रक्रिया व पॅकिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली १ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एचडीएफसी बँकेने पोलिसांत दिली. कर्ज मंजूर करून घेतले; पण प्रकल्प उभा केला नाही, त्यामुळे बँकेची फसवणूक झाली असे तक्रारीत म्हटले आहे. बँकेचे सह उपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी फिर्याद दिली.याप्रकरणी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फसवणुकीचा प्रकार २३ नोव्हेंबर २०२२ ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडला. मुकुंद हणमंत जाधवर, स्वप्नाली मुकुंद जाधवर, सखूबाई हणमंत जाधवर, (तिघे रा. मधाळे चौक, मारुती मंदिर, वालवड, ता. बार्शी, जि. सोलापूर), विजय शैलेंद्र कराड (वय ३१, रा. सद्गुरू कृपा, दत्तनगर, भालगाव, ता. बार्शी), राजाराम विठ्ठल खरात (वय ४८, रा. खाडे वस्ती, लोहमार्गाजवळ, एरंडोली रस्ता, बेडग, ता. मिरज), अजित विष्णू दळवी (रा. एरंडोली) व लता विठ्ठल जाधव (रा. पायप्पाचीवाडी, ता. मिरज), अशी संशयितांची नावे आहेत. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, सातही संशयित डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत. या शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत बेदाणा प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव त्यांनी सांगलीतील एचडीएफसी बँकेत दाखल केला. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेतून कर्ज मिळावे अशी मागणी केली. बँकेने कागदपत्रांची छाननी करून प्रकल्प उभारणीसाठी १ कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. हे कर्ज गौरी कन्स्ट्रक्शन ॲण्ड अर्थ मूव्हर्स (यमुना हाईट्स, गुरुकृपा सोसायटी, कोंढवा, पुणे), एस. जे. एम. एम असोसिएट्स ॲण्ड मल्टी सर्व्हिसेस (सिद्धिविनायक हौसिंग सोसायटी, विजयनगर, सांगली) व शुभ गणेश ॲग्रो इंडस्ट्रीज (एरंडोली रस्ता, बेडग, ता. मिरज) या तीन व्हेंडर कंपन्यांच्या नावावर बँकेने मंजूर केले. त्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग केली.
पैसे घेतले, प्रकल्प नाही उभारलाअटी व शर्तीनुसार हा प्रकल्प तीन महिन्यांत पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याची अट होती. संशयितांनी बँकेकडे तारण असलेल्या जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले होते; पण आजअखेर प्रकल्प उभाच केला नाही. कर्जाचीही परतफेड केली नाही. बँकेची १ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केली. तशी फिर्याद बँकेतर्फे पोलिसांत देण्यात आली.