आटपाडी : लग्न जुळवून देतो, असे आमिष दाखवून दोन कुटुंबांची एकूण पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनाजी शिवाजी कदम (वय ६०, व्यवसाय शेती, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १८ मार्च २०२५ ते २० मार्च २०२५ या कालावधीत कौठुळी, दिघंची व शीतलादेवी मंदिर, बारड, मुदखेड (जि. नांदेड) येथे हा प्रकार घडला. संशयित आरोपी धनाजी भीमराव शिंदे (रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) व पोलू शंकर गिरी (रा. शेनीदेळुप, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांनी संगनमत करून फिर्यादीस त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहून लग्न लावून देतो, असे सांगितले. आरोपी पोलू शंकर गिरी यांच्या मदतीने 'आरती' नावाच्या मुलीला शीतलादेवी मंदिर, बारड येथे आणून सुपारी फोडण्यात आली. त्यावेळी लग्न ठरल्याचा देखावा करून फिर्यादीकडून २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम घेतली गेली. यानंतर, लग्न होण्याअगोदर संबंधित मुलगी दिघंची येथून निघून गेली. पुढील चौकशीत असे समोर आले की, हा प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्या बाबतीतही झाला आहे. आरोपींनी त्यांच्यासाठीही लग्न लावून दिल्याचा भास निर्माण करून त्यांच्याकडूनही २ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र संबंधित मुलगी ३० ते ४० दिवसांत सासर सोडून निघून गेली. या घटनांमुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी धनाजी कदम यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चौकशीअंती व उपविभागीय पोलिस अधिकारी, विटा यांच्या लेखी परवानगीने दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणातील एकूण फसवणूक रक्कम ५ लाख रुपये असून पुढील तपास आटपाडी पोलिस करीत आहेत.
Web Summary : Atpadi: Two families were defrauded of ₹5 lakhs under the guise of marriage arrangements. One bride fled before the wedding, and another left after 30-40 days. Police are investigating the case against two suspects.
Web Summary : आटपाडी: विवाह कराने के नाम पर दो परिवारों से ₹5 लाख की धोखाधड़ी हुई। एक दुल्हन शादी से पहले भागी, और दूसरी 30-40 दिनों के बाद चली गई। पुलिस दो संदिग्धों के खिलाफ मामले की जांच कर रही है।