मिरज : मिरजेतील रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुभाषनगर येथील हुळळे प्लॉट येथे असणाऱ्या डॉ. सचिन मजती यांच्या फार्म हाऊसवर ही घटना घडली.क्षितिजकुमार कुंडलिक क्षीरसागर (२२, रा. अहमदनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. क्षितिजकुमार भारती दंत महाविद्यालयात अखेरच्या वर्षात शिकत होता. बुधवारी रंगपंचमीनिमित्त दंत महाविद्यालयाचे पाच ते सहा विद्यार्थी मिरजेतील दंतरोगतज्ज्ञ डॉ. मजती यांच्या फार्म हाऊसवर रंगपंचमी खेळण्यासाठी गेले होते. रंगपंचमी खेळल्यानंतर दुपारी तीन वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले.शेतातील मोठ्या शेततळ्यात पोहताना क्षितिजकुमार हा अचानक पाण्यात बुडाला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित सिंद हे घटनास्थळी पोहचले.सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने क्षितिजकुमार याचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भारती डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले होते. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
Sangli: रंगपंचमी खेळून पोहायला गेला, मिरजेत वैद्यकीय विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:28 IST