सांगलीतील ९५ वर्षांचा ‘तरुण’ जलतरणात अव्वल

By Admin | Updated: May 27, 2015 00:58 IST2015-05-26T23:09:54+5:302015-05-27T00:58:33+5:30

सुवर्णपदकांची कमाई : राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो आणि जिंकूनच परत येतो !

95 years old Sangli's 'Tarun' is the best in the swimming | सांगलीतील ९५ वर्षांचा ‘तरुण’ जलतरणात अव्वल

सांगलीतील ९५ वर्षांचा ‘तरुण’ जलतरणात अव्वल

नरेंद्र रानडे - सांगली -वयाच्या आठव्या वर्षापासून पोहण्याची आवड जोपासणाऱ्या सांगलीतील ९५ वर्षीय ‘तरुणा’कडे जलतरण स्पर्धेतील सुवर्ण व रौप्यपदकांचा ढीग आहे! अजूनही ज्येष्ठांच्या जलतरण स्पर्धेत सहभागी होण्याचा त्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. देशातील कोठेही स्पर्धा जाहीर झाली की हा ‘तरुण’ स्थळ, वेळ आणि वयाचा विचार न करता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो आणि जिंकण्याच्याच आत्मविश्वासाने पाण्यात उडी मारतो! आणि हमखास सुवर्णपदक पटकावूनच सांगलीला परत येतो. त्याचे नाव आहे, मारुती चुडाप्पा कांबळे.
मारुती कांबळे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२१ चा. त्यांचे लहानपण कृष्णेच्या किनारीच गेले. लहानपणी वडिलांबरोबर ते कृष्णा नदीत पोहायला जायचे आणि मग त्यांना त्याची आवडच लागली. शिक्षण चौथीपर्यंतच झाले असले, तरी त्यांना व्यायामाची आवड होती. नियमित सूर्यनमस्कार, जोर आणि बैठका घातल्याचा लाभ त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात होत आहे. सध्यादेखील त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. सकाळी चार वाजता उठून योगासने, वृत्तपत्र वाचन, त्यानंतर गणेशनगर येथील जलतरण तलावात सुमारे अर्धा तास पोहणे. दुपारी सायकलवरून वेलणकर अनाथालयात सेवा म्हणून कार्य करणे. सायंकाळी हलका आहार व विश्रांती. तरुण वयात त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. १९४२ मध्ये ते पोलीस दलात होते. त्याकाळी ब्रिटिश सरकारने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना तुरुंगात ठेवले होते. त्या बराकीचे पहारेकरी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. कालांतराने १९४७ मध्ये पोलिसी सेवेला रामराम ठोकला. तद्नंतर त्यांनी एक्साईज खाते, नगरपालिका, आरवाडे हायस्कूलमध्ये कर्मचारी म्हणून, तर रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात वॉचमन म्हणून नोकरी केली. या सर्व कार्यकाळात त्यांनी पोहण्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. १९८८ पासून ज्येष्ठांसाठीच्या जलतरण स्पर्धा घेण्यात येऊ लागल्या आणि प्रतिवर्र्षी मारुती कांबळे त्यात सहभागी होऊ लागले. आज ९५ व्या वर्षातदेखील त्यांची तब्येत उत्तम असल्याने विविध राज्यस्तरीय व देशपातळीवरील स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना बक्षिसाचे विशेष आकर्षण नाही.


जलतरणपटू नव्हे, तर...
२६ जानेवारी १९७६ पासून दोनशे दिवस कांबळे यांनी सायकलवरून भारत भ्रमणयात्रा केली आहे.
१९९० मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथील पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता.


गुलबर्गा येथील स्पर्धेत सुवर्णपदक
प्रामुख्याने जलतरणामधील ४०० व २०० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय आणि ५० मीटर बॅक या प्रकारात मारुती कांबळे यांचे विशेष प्राविण्य आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी गुलबर्गा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे, तर जानेवारीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतदेखील ते सहभागी होणार आहेत. आतापर्यंत त्यांनी १६ हून अधिक राष्ट्रीय तसेच विविध राज्यस्तरीय आणि विविध संघटनांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.


१९५० मध्ये गिरगाव ते वर्सोवा या वीस मैल अंतराच्या समुद्री मार्गात आयोजित केलेल्या स्पर्धेत मारुती कांबळे यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी दहा मैल अंतर लिलया पार केले परंतु नदीत पोहण्याची सवय असल्याने नंतर पायात गोळे येऊ लागले. परिणामी त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली.



पोहणे व सायकलिंग व्यायामप्रकार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कित्येक वर्षांपासून माझा पोहण्याचा नियमित व्यायाम आहे. भविष्यकाळातदेखील नियमित पोहण्याच्या दिनक्रमात खंड पडू देणार नाही. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळविण्याचा मानस आहे.
-मारुती कांबळे, ज्येष्ठ जलतरणपटू

Web Title: 95 years old Sangli's 'Tarun' is the best in the swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.