लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गतवर्षातील अनुभवातून शिकत उद्योजकांनी अनेक उपाययोजना केल्यामुळे यंदा परप्रांतीय कामगारांचे गावी परतण्याचे प्रमाण घटले आहे. यावेळी केवळ ५ टक्के कामगार लॉकडाऊन काळात परतले असून, ९५ टक्के कामगारांनी जिल्ह्यात थांबून उद्योगचक्राला बळ दिले आहे.
सांगली जिल्ह्यातील ६० टक्के उद्योग सध्या सुरू आहेत. ऑक्सिजनअभावी बंद पडलेल्या फॅब्रिकेशन उद्योगांसह ४० टक्के कारखाने सध्या बंद आहेत. गतवेळी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तसेच भीतीचे सर्वत्र वातावरण असल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर गावी परतले होते. यंदा अल्प कालावधीसाठी लॉकडाऊन व उद्योजकांनी कामगारांच्या राहण्याची, जेवणाची सोय केल्यामुळे परप्रांतीयांची पावले थांबली आहेत. साडेचार हजार कामगारांपैकी केवळ २०० कामगार परतले आहेत. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम उद्योगांवर झाला नाही.
निर्यातदार उद्योगांचे चक्रही सध्या सुरळीत सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीत घट झाल्याने २५ टक्के निर्यात घटली आहे. तरीही मागील कोरोना लाटेवेळी काही काळ पूर्णपणे निर्यात उद्योग ठप्प झाले होते. यंदाची परिस्थिती तुलनेते खूप चांगली आहे. त्यामुळे उद्योजकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बांधकाम क्षेत्रातही तशीच परिस्थिती आहे. या क्षेत्रातील १० टक्केच परप्रांतीय कामगार परतले आहेत. त्यामुळे कामावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.
चौकट
औद्योगिक वसाहतींमधील एकूण कामगार संख्या २९,०००
परप्रांतीय कामगारांची संख्या ४,५००
परतलेले कामगार २५०
थांबलेले कामगार ४२५०
औद्योगिक वसाहतींमधील कारखाने १२००
सुरू असलेले उद्योग ७२०
निर्यातदार उद्योजक १५०
प्रतिमाह जिल्ह्यातील केवळ औद्योगिक वसाहतींमधील निर्यात उलाढाल ५०० कोटींची आहे. यात सध्या २५ टक्के घट झाली आहे.
कोट
मागील वर्षापेक्षा यंदा परिस्थिती चांगली आहे. परप्रांतीय कामगार परतण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधा करून देतानाच कोरोना नियमांचे पालन करीत ६० टक्के उद्योग सुरू आहेत. शासनाने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचाही हा परिणाम आहे.
- सतीश मालू, अध्यक्ष कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज
कोट
निर्यात उद्योजकांना सध्या काही अडचण येत नाही. मागील वर्षापेक्षा स्थिती चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्नता थांबली, तर मोठी अडचण येते. त्यामुळे ही संलग्नता कायम ठेवून निर्यात उद्योग सुरळीत आहे.
- संजय अराणके, अध्यक्ष, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
चौकट
बांधकाम क्षेत्राला ५० टक्के फटका
जिल्ह्यात बांधकामाला लागणाऱ्या साहित्याची दुकाने बंद असल्याने या क्षेत्राला ५० टक्के फटका बसला आहे. एकूण सुमारे २ हजार ५०० परप्रांतीय कामगारांपैकी केवळ १० टक्के कामगार परतले आहेत, अशी माहिती क्रेडाईचे दीपर्क सूर्यवंशी यांनी दिली.