कवठेमहांकाळमध्ये ९८ टक्के मतदान
By Admin | Updated: August 9, 2015 00:47 IST2015-08-09T00:35:22+5:302015-08-09T00:47:10+5:30
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक

कवठेमहांकाळमध्ये ९८ टक्के मतदान
कवठेमहांकाळ : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कवठेमहांकाळ तालुक्यात शनिवारी अत्यंत चुरशीने आणि शांततेने ९८ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. विकास सोसायटी मतदारसंघातील मतदार आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. मतदारांनी मतदान केंद्रावर रांगेने उभे राहून मतदान केले. विकास सोसायटी मतदारसंघाचे या तालुक्यात ८३९ इतके मतदान आहे. त्यापैकी ८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात ९८.२१ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत गटातही चुरशीचे मतदान झाले. ५४५ पैकी ५२३ मतदारांनी मतदान केले. येथे ९६.१४ टक्के मतदान झाले. तसेच प्रक्रिया गटामध्ये ७१ पैकी ६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ९२.९५ टक्के मतदान झाले. व्यापारी गटातील ३० पैकी ३० मतदारांनी मतदान करून १०० टक्के मतदानाचा हक्क पार पाडला. हमाल व तोलाईदारांनीही १४ पैकी १४ मते दिली.
अजितराव घोरपडे, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, सुरेश पाटील, राजवर्धन घोरपडे, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, वैशाली पाटील, अनिल शिंदे, सुनील माळी, तुकाराम पाटील, तात्यासाहेब नलवडे तसेच दोन्ही पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)
सामना रंगला
गेले आठ ते दहा दिवस तालुक्यात जयंत पाटील, मदन पाटील, संजय पाटील, सुमनताई पाटील, विलासराव जगताप, विजय सगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलच्या विरोधात डॉ. पतंगराव कदम, अजितराव घोरपडे, विशाल पाटील, विक्रम सावंत, दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील वसंतदादा पॅनेल यांच्यात सामना रंगला होता.