नोकरीच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: September 7, 2014 23:18 IST2014-09-07T21:45:08+5:302014-09-07T23:18:03+5:30
इस्लामपुरात गुन्हा : कुंडलमधील भामट्याच्या प्रतापाने खळबळ

नोकरीच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक
इस्लामपूर : खरातवाडी, मलकापूर येथील तिघांची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत जवळपास ९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुंडल (ता. पलूस) येथील सचिन वसंत जाधव याच्यासह त्याच्या कुटुंबातील चौघांविरुध्द इस्लामपूर पोलिसांनी आज गुन्हा नोंद केला. भारती विद्यापीठ, रयत व स्वामी विवेकानंद संस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सचिन जाधव याने ही रोख रकमेची लुबाडणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.पृथ्वीराज प्रकाश खरात (वय २७, रा. खरातवाडी, ता. वाळवा) यांनी आज पोलिसांकडे ही फसवणुकीची फिर्याद दिली. त्यामध्ये सचिन जाधवसह त्याचे वडील वसंतराव भाऊसाहेब जाधव, आई प्रभावती, पत्नी सौ. कविता आणि भाऊ प्रशांत वसंत जाधव (सर्व रा. कुंडल, ता. पलूस) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नोव्हेंबर २०११ मध्ये पृथ्वीराज खरात व सचिन जाधव यांची ओळख झाल्यानंतर सचिनने आपण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व मानव अधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून मोठा राजकीय वरदहस्त असल्याची बतावणी करीत पृथ्वीराज खरात याला आपल्या जाळ्यात ओढले. त्यांना आपले मोठ्या राजकीय पुढाऱ्यांबरोबरचे फोटो दाखवून आपण भारती विद्यापीठ, रयत व विवेकानंद अशा मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये अनेकांना नोकरी दिल्याचे सांगितले.त्यावर पृथ्वीराज खरात यांनी आपल्या बहिणीला नोकरी लावण्यासाठी सचिन जाधव याला मे २०१२, एप्रिल व जून २०१३ या महिन्यात ३ लाख ५० हजार रुपये रोखीने दिले होते. नोकरीची आॅर्डर दिल्यानंतर उर्वरित ३ लाख ५० हजारांची रक्कम द्यायची होती; मात्र अर्धी रक्कम देऊनही सचिन जाधव हा खरात यांना टाळू लागला. त्यांनी कुंडल येथे त्याच्या घरी जाऊन नोकरीबाबत विचारणा केल्यावर त्याच्या कुटुंबियांनी धमकावून पुन्हा इकडे यायचे नाही, असे बजावले. शेवटी खरात यांनी पोलिसांत तक्रार देण्याची समज दिल्यावर सचिन जाधव याने १०० रुपयांच्या स्टँपवर लेखी हमी देऊन लवकरच नोकरीची आॅर्डर देतो, असे लिहून दिले. मात्र त्यानंतरही सचिन जाधव याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने खरात यांनी आज पोलिसांत फिर्याद दिली.पृथ्वीराज खरात यांच्याप्रमाणेच जाधव याने आबासाहेब लक्ष्मण गावडे (रा. मलकापूर) यांच्याकडून शिक्षण सेवक पदासाठी ४ लाख रुपये, तर खरातवाडीच्या सागर हणमंत खरात याला शिपायाची नोकरी देतो म्हणून १ लाख रुपयाला ठकवल्याचे त्याने स्वत: मुद्रांकावर लिहून दिले आहे. (वार्ताहर)